नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेले रशिया-युक्रेन युद्ध असो वा इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध असो किंवा चीन आणि तैवानमधील संघर्ष असो प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय हालचालींवर लक्ष ठेवून आहे. या सर्व संघर्षांमध्ये सगळ््यांना चिंता आहे, ती म्हणजे आण्विक शस्त्रास्त्रांच्या वापराची. कारण बहुतांश देश हे आण्विक शस्त्रांनी सज्ज आहेत. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रांस, चीन, पाकिस्तान, भारत, उत्तर कोरिया आणि इस्त्रायल हे जगभरातील नऊ देश आण्विक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहेत. या सर्व देशांकडे मिळून असलेल्या आण्विक शस्त्रास्त्रांची संख्या १२ हजार १२१ इतकी आहे. यातील जवळपास ३९०४ शस्त्रे ही हल्ला झाल्यास प्रतिहल्ल्यासाठी तयार आहेत.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूट या स्विडनस्थित स्वायत्त आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जागतिक स्तरावर वेगवेगळ््या देशांकडील आण्विक शस्त्रांच्या साठ्यांचा अभ्यास केला आहे. यामध्ये भारताकडील आण्विक शस्त्रांमध्ये पाकिस्तानच्या तुलनेत वाढ झाल्याचे नमूद केले आहे.
पाकपेक्षा जास्त आण्विक शस्त्रे
भारताकडे मागील वर्षी असलेल्या आण्विक शस्त्रांमध्ये ८ शस्त्रांची वाढ झाली आहे. मागील वर्षी ही संख्या १६४ होती, ती आता १७२ वर पोहोचली आहे. यानुसार भारताकडे आता पाकिस्तानपेक्षा दोन आण्विक शस्त्रे वाढली आहेत. परंतु कुठेही तैनात करण्यात आलेले नाही.
पाकिस्तानकडे किती आण्विक शस्त्रे?
पाकिस्तानकडील आण्विक शस्त्रांचा विचार करता त्यांच्याकडे ६० ते ३२० किमी मारा करु शकतील, अशी नस्त्र, हत्फ, गजनवी आणि अब्दाली ही कमी अंतराची क्षेपणास्त्रे आहेत तर गौरी आणि शाहीन ही मध्यम मा-याची दोन क्षेपणास्त्रे आहेत. त्यांची मारक क्षमता ९०० ते २७०० किमी आहे. या दोन क्षेपणास्त्रांद्वारे जर भारतावर हल्ला झाला तर दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, मुंबई, पुणे, नागपूर, भोपाळ आणि लखनौ ही शहरे या हल्ल्याने प्रभावित होवू शकतात. यात जर आण्विक शस्त्रास्त्रांचा वापर झाला तर मोठ्या प्रमाणात विध्वंस होवू शकतो.
भारताची आण्विक ताकद किती?
भारताकडे ३५० किमी मारक क्षमता असलेले पृथ्वी हे कमी अंतराचे क्षेपणास्त्र आहे तर अग्नी १ याची क्षमता ७०० किमी आहे. अग्नी २ हे २००० किमी तर अग्नी ३ हे ३००० किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. अग्नी ५ हे भारताचे अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून त्याची क्षमता ५००० ते ७५०० किलोमीटर आहे. याचा वापर करायची वेळ आल्यास पाकिस्तानातील सर्व प्रमुख शहरे अग्नी ५ च्या निशाण्यावर येवू शकतात. भारताने पाकिस्तानवर जर अनुबॉम्बचा प्रयोग केला तर रावळपिंडी, लाहौर, इस्लामाबाद,नवशेरा आणि कराची ही शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त होवू शकतात.
भारत-पाकची आण्विक निती
आण्विक शस्त्रास्त्रांच्या वापराबाबत जागतिक स्तरावर वेगवेगळ््या देशांनी तेथील परिस्थितीनुसार वेगवेगळी धोरणे अवलंबिली आहेत. भारताने १९९९ मधील दुस-या पोखरण अनुचाचणीनंतर नो फर्स्ट यूज (पहिल्यांदा वापर नाही) या तत्वाचा अंगिकार केला. या अंतर्गत भारत केवळ शत्रूकडून हल्ला झाला तरच तो आण्विक शस्त्रास्त्रांचा वापर करेल. परंतु पाकिस्तान अशा कोणत्याच नितीचा अंगिकार करत नाही. पाकिस्तानमध्ये आण्विक शस्त्रांचा वापर हा पुर्णता तेथील सैन्यदलाच्या मर्जीवर अवलंबून आहे.
आण्विक शस्त्रास्त्रांची जागतिक स्थिती
रशियाने जवळपास ४३८० पैकी १७१० आण्विक शस्त्रे ही क्षेपणास्त्रे तसेच फायटर जेट्समध्ये तयार ठेवली आहेत तर अमेरिकेकडे असलेल्या ३७०८ आण्विक शस्त्रास्त्रांपैकी १७७० हत्यारे ही कोणत्याही परिस्थितीत हल्ला झाल्यास प्रत्युत्तरादाखल तैनात आहेत. फ्रान्सकडे असलेल्या एकूण २९० शस्त्रांपैकी २८० ही तैनात आहेत.तर इंग्लंडने १२० आणि चीननेही २४ आण्विक हत्यारे ही सज्ज ठेवली आहेत.