नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा निवडणुकीच्या मैदानात प्रथमच उतरत आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली या आपल्या कुटुंबाच्या पारंपरिक मतदारसंघासोबतच वायनाडमधून (केरळ) निवडणूक लढविली आणि दोन्ही ठिकाणी विजय मिळविला. मात्र, निवडणूक निकालानंतर दोन्हीपैकी एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे लागते आणि त्यासंबंधीचा निर्णय १४ दिवसांत घ्यावा लागतो. त्यानुसार राहुल गांधी यांनी दि. १७ जून २०२४ रोजी रायबरेलीचे प्रतिनिधित्व करायचे ठरविले असून, वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी केली.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार २ मतदारसंघातून विजय झालेल्या उमेदवाराला निकालानंतर १४ दिवसांच्या आत कोणत्या तरी एका मतदारसंघातून राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वायनाडमध्ये आता पोटनिवडणूक लागणार असून, या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसकडून प्रियंका गांधी निवडणूक लढणार आहेत. या निमित्ताने त्या प्रथमच निवडणूक लढणार आहेत. राहुल गांधी यांनी २०१९ मध्येही वायनाडमधूनच निवडणूक लढविली होती. त्यावेळी ते अमेठीमधून पराभूत झाले. पण वायनाडमधून निवडून आले होते.
प्रियंका गांधी आता प्रथमच निवडणूक आखाड्यात उतरणार आहेत. यापूर्वी त्यांनी केवळ पक्षसंघटनेत काम केले. सध्या त्या कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य आहेत. २००४ मध्ये त्यांनी निवडणूक प्रचारात प्रथमच सहभाग नोंदवला होता. २००७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रियंका गांधींवर रायबरेली-अमेठीतील १० जागांची जबाबदारी दिली होती. २३ जानेवारी २०१९ रोजी त्यांना अधिकृतरित्या उत्तर प्रदेशातील पूर्व भागात कॉंग्रेसचे प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्त केले. तेव्हापासून त्या सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या. ११ सप्टेंबर २०२० रोजी उत्तर प्रदेशातील प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्त झाल्या.
प्रियंका गांधींचे पदव्युत्तर शिक्षण
प्रियंका गांधींचा जन्म १२ जानेवारी १९७२ रोजी झाला. त्या राजीव गांधी फाऊंडेशन ट्रस्टच्या ट्रस्टी आहेत. त्यांनी १९९७ मध्ये उद्योजक राबर्ट वढेरा यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांनी मनोविज्ञान विषयात पदवी घेतली, तर बुद्धिस्ट स्टडीजमध्ये मास्टर डिग्री घेतली. त्या लोकसभा निवडणूक लढविणा-या गांधी परिवारातील १० व्या सदस्य आहेत.