भारत टी-२० वर्ल्ड कप विजेता

yongistan
By - YNG ONLINE
बार्बाडोस : वृत्तसंस्था 
हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने टी-२० विश्वचषकावर दि. २९ जून २०२४ रोजी नाव कोरले. अखेरच्या ४ षटकांत भारतीय गोलंदाजांनी सामना फिरवला. २४ चेंडंूवर दक्षिण आफ्रिकेला २६ धावांची गरज असताना हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप यांनी भेदक मारा केला आणि मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादवने डेविड मिलरचा झेल घेतला आणि तिथून मॅच फिरवित भारताने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला आणि बार्बाडोसच्या मैदानात इतिहास रचत भारताने २००७ नंतर प्रथमच म्हणजेच १७ वर्षांनी टी-२० विश्वचषकावर नाव कोरले.सूर्यकुमारच्या अफलातून कॅचने मॅचचा नूर पालटला. त्यामुळे हा ख-या अर्थाने हा कॅच ऑफ द मॅच ठरला.
सूर्यकुमार यादवने अखेरच्या षटकात पकडलेल्या डेव्हिड मिलरच्या झेलच्या जोरावर भारताने टी वर्ल्ड कप जिंकला. मिलर हा भारताच्या विजयातील मोठा अडसर होता. पण हार्दिकच्या गोलंदाजीवर तो बाद झाला आणि भारताच्या बाजूने सामना झुकला. भारताने यावेळी १३ वर्षांच्या दुष्काळ संपवला. कारण भारताने यापूर्वी वर्ल्डकप २०११ साली जिंकला होता. विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १७६ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताने गोलंदाजीची दमदार सुरुवात करीत दक्षिण आफ्रिकेची २ बाद १२ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण अखेरच्या षटकात जेव्हा मिलर बाद झाला. त्यानंतर भारताने ७ धावांनी हा सामना जिंकला.
बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात भारताला यश मिळवून दिले. बुमराहने यावेळी सलामीवीर रीझा हेनड्रीक्सला चार धावांवर बाद केले. त्यानंतर अर्शदीप सिंग यावेळी भारताच्या मदतीला धावून आला आणि त्याने संघाला मोठे यश मिळवून दिले. कारण अर्शदीपने यावेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमला चार धावांवर बाद केले. त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेची २ बाद १२ अशी अवस्था केली होती. त्यावेळी भारताला दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलता आले असते, पण तसे घडले नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला यावेळी सावरले तेकिं्वंटन डीकॉकने. कारण डीकॉकने यावेळी स्ट्रीस्टन स्टब्सच्या साथीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुस-या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली. पण त्यावेळी अक्षर पटेलने ही जोडी फोडली. अक्षरने स्टब्सला बाद केले. त्याला २१ चेंडूंत ३१ धावा करता आल्या. त्यानंतर डीकॉक यावेळी भारताच्या विजयाच्या मार्गात अडसर बनत होता. पण पुन्हा एकदा अर्शदीप भारताच्या मदतीला आला. कारण अर्शदीपने डीकॉकला आपल्या जाळ््यात फासले. डीकॉकने यावेळी ३१ चेंडूंत ३९ धावांची खेळी साकारली.
भारताच्या विजयाच्या मार्गात आता हेन्रीच क्लासिन आणि डेव्हिड मिलर हे दोन फलंदाज होते. त्यामुळे दोघांना बाद करण्याची रणनिती रोहित शर्मा आखत होता. पण डेव्हिड मिलरने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला होता आणि क्लासिन त्याला चांगली साथ देत होता. क्लासिन २७ चेंडूंत ५२ धाव काढून बाद झाला आणि भारताला हायसे वाटले. 
विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा करता आल्या. कोहलीने यावेळी ५९ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७६ धावांची खेळी साकारली. भारताच्या या धावसंख्येमध्ये मोलाचा वाटा होता तो अक्षर पटेलचा. अक्षरने १ चौकार आणि चार षटाकारांच्या जोरावर ३१ चेंडूंत ४७ धावांची खेळी साकारली. 
कोच राहुल द्रविडला 
विश्वविजेतेपदाची भेट
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला संघाने जेतेपदाच्या ट्रॉफीसह निरोप दिला. यावेळी राहुल द्रवीडलाही खूप आनंद झाला. त्यानंतर त्याने टीम इंडियाचे अभिनंदन केले. यामुळे २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न मिळालेल्या संधीचे दु:ख अखेर त्याच्या मनातून दूर झाले.