रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी विकास महामंडळ

yongistan
By - YNG ONLINE
- मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
-रिक्षा-टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देणार

मुंबई _: प्रतिनिधी 
रिक्षा आणि टॅक्सी चालवून रोजीरोटी कमावणा-या, हातावर पोट असलेल्या लोकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.  शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने भेटीसाठी आलेल्या रिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी दि. १८ जून २०२४ रोजी ही माहिती दिली. या वेळी राज्याचे एमएसआरडीसी मंत्री दादाजी भुसे, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम आणि रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सध्या मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून जो अतिरिक्त दंड आकारला जातो तो या पुढे आकारला जाणार नाही, असे सांगितले. तसे स्पष्ट निर्देश परिवहन विभागाच्या आयुक्त आणि पोलिस उपयुक्तांना दिले असल्याचे सांगितले मात्र त्या सोबतच नियम मोडला असेल तर मात्र हा दंड आकारला जाईल, असेही स्पष्ट केले. त्या सोबतच रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी ‘महाराष्ट्र टॅक्सी-ऑटो रिक्षा चालक-मालक कल्याणकारी महामंडळ’ सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
टॅक्सी चालकाला विमा कवच
या महामंडळांतर्गत प्रत्येक रिक्षा-टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल तसेच त्याला तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. अपघातात अचानक कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून ५० हजार देणार. ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांच्या मुलांना शिकायचे असेल त्यांना शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल. त्यांच्या मुलांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल केले जाईल. तसेच व्यवसायाला अर्थसहाय्य केले जाईल.