काश्मीर खो-याशी जोडला देश
जम्मू : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामूल्ला रेल्वे लिंक उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करुन भारतीय रेल्वेने भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. हा मार्ग अतिआव्हानात्मक असून २७२ किलोमीटरचा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्याने देश काश्मीर खो-याशी जोडला गेला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील भारतीय रेल्वेने आतापर्यंत केलेल्या आव्हानात्मक कामांपैकी हे एक काम आहे. या योजनेला २००२ साली राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले होते. या रेल्वेमार्गाची लांबी ११९ किलोमीटर असून यामध्ये ३८ बोगदे आहेत. यामधील टी-१८ हा बोगदा सर्वात लांब असून त्याची लांबी जवळजवळ १२.७५ किमी इतकी आहे. हा बोगदा देशातील सर्वात लांब वक्र कमानीचा बोगदा आहे. या प्रकल्पात एकूण १३ किमी लांबीचे ९२७ पूल आहेत.
यामध्ये चिनाब नदीवरील पूल हा सर्वाधिक आव्हानात्मक आहे. या पुलाची लांबी १३१५ मीटर इतकी आहे तर कमानीची लांबी ४९७ मीटर आहे. या गगनचुंबी पूलाची उंची ३९५ मीटर आहे. त्यामुळे याला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल मानले जाते. रेल्वे बोर्ड,उत्तर रेल्वे, कोकण रेल्वे यांच्या संयुक्त कामगिरीतून निर्मित या पूलावरून गुरुवार, दि. २० जून २०२४ रोजी संगलदान ते रियासी दरम्यानच्या विद्युतीकरण केलेल्या ४६ किलोमीटर अंतराच्या मार्गावर रेल्वेचे परीक्षण पार पडले. यामध्ये या सर्वोच्च पूलावरुन ४० किमी प्रतितास या वेगाने ही रेल्वे धावली.