सेंट विन्सेंट : अफगाणिस्तानने ट्वेन्टी-२० विश्वचषकात मंगळवार, दि. २५ जून २०२४ रोजी नवा इतिहास घडवला. अफगाणिस्तानने अखेरच्या सुपर एट सामन्यात बांगलादेशचा पराभव करून ट्वेन्टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात अफगाणिस्तानला २० षटकात ५ बाद ११५ धावांचीच मजल मारता आली होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशसमोर विजयासाठी १९ षटकात ११४ धावांचे आव्हान होते. अफगाणिस्तानने बांगलादेशला १८ व्या षटकांत १०५ धावांत रोखले. या विजयासह अफगाणिस्तानने भारतापाठोपाठ पहिल्या गटातून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे आव्हान सुपर-८ साखळीतच संपुष्टात आले.
अफगाणिस्ताननं इतिहास रचला
अफगाणिस्तानने सुपर ८ मध्ये प्रथम ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. त्यानंतर आज बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम रहमानुल्लाह गुरबाजने ४३ धावा केल्या. यानंतर राशिद खान आणि नवीन-उल-हक या दोघांनी प्रत्येकी चार विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे टी-२० वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले. सुपर ८ च्या ग्रुप १ मधून भारत, अफगाणिस्तान आणि ग्रुप २ मधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. आता उपांत्य फेरीत अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने येतील. दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार आहे.