इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय
नवी दिल्ली : काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत खासदार राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे, याची माहिती कॉंग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी मंगळवारी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते बनविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. याशिवाय लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांनाही याबाबत पत्र लिहून कळविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. मंगळवारी रात्री खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर माहिती देताना कॉंग्रेसचे नेते आणि खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली. विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड करावी, यासाठी हंगामी अध्यक्षांना पत्रही लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी ९ जून रोजी काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला होता. यानंतर बैठकीनंतर राहुल गांधी यांनी यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे, असे म्हटले होते. सन २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा ५२ वरून ९९ पर्यंत म्हणजे जवळपास दुप्पट झाल्या आहेत. २०१४ च्या निवडणुकीत पक्षाला केवळ ४४ जागा जिंकण्यात यश आले होते. विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान ५५ जागा आवश्यक असतात. मात्र, मागच्या १० वर्षांत एवढ्या जागा न मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नव्हते.
२००४ मध्ये राहुल गांधी यांनी राजकारणात एन्ट्री केली. त्यांनी त्यावेळी अमेठीतून निवडणूक लढविली आणि तेथे बसपा उमेदवार चंद्रप्रकाश मिश्रा मटियारी यांचा २ लाख २ लाख ९० हजार मतांनी पराभूत केले. तेव्हापासून ते राजकारणात सक्रीय झाले. २०१३ मध्ये त्यांच्याकडे पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे ते अधिक सक्रीय झाले. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या. परंतु पराभवाचा सामना करावा लागला. २०२४ मध्ये त्यांच्याकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली आहे.