नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यंदाच्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने गाजवला. त्याने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानही मिळवला. यासह त्याने ग्लेन मॅक्ग्रा आणि मिचेल स्टार्क यांच्या ‘आगळ््या’ कामगिरीशी बरोबरी केली. त्याचबरोबर या वर्ल्ड कपमध्ये त्याने इतिहास रचला.
भारतीय संघाने यंदाच्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि पुन्हा एकदा जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी, २००७ मध्ये भारतीय संघाने हा टी-२० वर्ल्ड कप उंचावला होता. यावेळी आपल्या भेदक मा-याने भारताला सामने जिंकून देण्यात बुमराहने मोलाची भूमिका बजावली. त्याने मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. बुमराहने स्पर्धेत एकूण २९.४ षटके टाकली. त्यात दहा चौकार आणि दोन षटकार लगावले गेले.
बुमराहने यंदाच्या वर्ल्ड कपमधील आठ सामन्यांत ८.२६ च्या सरासरीने पंधरा विकेट घेतल्या. त्याच्या कामगिरीचे फळ त्याला मिळाले. त्याला ‘स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू’ म्हणून गौरवण्यात आले. मात्र, त्याने पंधरा विकेट घेतल्या असल्या, तरी त्याला पूर्ण स्पर्धेत एकही धाव करता आली नाही. एकही धाव न करता टी-२० वर्ल्ड कपमध्ये ‘सर्वोत्तम खेळाडू’चा मान मिळवणारा बुमराह पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी केवळ ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्ग्रा २००७ वन-डे वर्ल्ड कपमध्ये, तर मिचेल स्टार्कने २०१५ वन-डे वर्ल्ड कपमध्ये एकही धाव न करता स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवला होता.
यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बुमराहने आतापर्यंत एकाही गोलंदाजाला जमला नाही. असा पराक्रम केला. एका टी-२० वर्ल्ड कपमध्ये शंभरहून अधिक चेंडू टाकणा-या गोलंदाजांत सर्वोत्तम इकॉनॉमी रेटमध्येही बुमराह सरस ठरला. त्याचा ४.१७ असा इकॉनॉमी रेट होता. याबाबतीत त्याने वेस्ट इंडिजच्या सुनील नारायणला मागे टाकले. २०१४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये सुनील नारायणचा ४.६० इकॉनॉमी रेट होता.