राज्यसभेत भाजपसमोर आव्हान

yongistan
By - YNG ONLINE
बिजू जनता दलाने सोडली साथ, विधेयक मंजुरीचे आव्हान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेत विरोधकांची ताकद वाढल्यानंतर आता राज्यसभेतही मोदी सरकारचे टेन्शन वाढले आहे. तीन तलाक, सीएए आणि कलम ३७० प्रकरणी भाजपची साथ देणा-या ओडिशातील बीजू जनता दलाने आता एनडीएला रामराम केल्याचे चित्र आहे. राज्यसभेत पंतप्रधानांच्या भाषणावेळी घोषणाबाजी करत बीजेडीच्या खासदारांनी वॉक आऊट केले. बीजेडीकडे राज्यसभेत ९ खासदार आहेत. 
राज्यसभेत सध्या एकूण २४५ खासदार आहेत. अशा परिस्थितीत कोणतेही विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला १२३ खासदारांच्या पाठिंब्याची गरज असते. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे राज्यसभेत केवळ ११४ खासदार आहेत. कोणतेही विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांना आणखी ११ खासदारांची आवश्यकता असेल. यावेळी ओडिशामध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या असून दमदार कामगिरी करत भाजपने बिजू जनता दलाला राज्यातील सत्तेतून हद्दपार केले. निवडणुकीपूर्वी ओडिशात भाजप आणि बीजेडी यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण तसे झाले नाही.