पुणे : प्रतिनिधी
जगातील पहिली सीएनजी बाईक शुक्रवार, दि. ५ जुलै २०२४ रोजी पुण्यातून लाँच झाली. ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत हमारा बजाज... म्हणणा-या बजाज कंपनीने या बाईकची निर्मिती केली असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज या बाईकच्या लाँचिंगचा सोहळा पार पडला. ऑटोमोबाईल क्षेत्रात नव्या क्रांतीची बिजे रोवणारा हा लाँचिंग सोहळा ठरला. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे याला पर्याय म्हणून सीएनजी वाहनांकडे पाहिले जात आहे. त्यात बजाजने सीएनजी बाईकचे लॉंचिंग केल्याने आता या गाड्या बाजारात मिळणार आहेत.
सीएनजीवर धावणारी ही जगातील पहिली दुचाकी असल्याचा दावा बजाज कंपनीने केला. आता कंपनीकडून लाँच करण्यात आलेल्या या बाईकसाठी केंद्र सरकारने देशात सीएनजी पंपांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षाही राजीव बजाज यांनी व्यक्त केली. १२५ सीसीचे इंजिन असणारी ही बाईक २ किलो सीएनजी टाकीची क्षमता ठेवते. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत तर सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधण्यात येत असून सध्या सीएनजी वाहनांना मोठी मागणी आहे. चारचाकी सीएनजी वाहनांची बाजारात चलती आहे. त्यातच आता बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात आली.
केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पिंपरी-चिंचवडमध्ये या बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेळी भारत हा वाहन उद्योग क्षेत्रात अगोदर सातव्या क्रमांकाचा देश होता. आता तो तिस-या क्रमांकावर पोहोचला आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली. वाहन उद्योग क्षेत्रात भारताचा आधी जगात सातवा नंबर होता. आता अलीकडच्या तीन महिन्यांपूर्वीच आपण जगात तिस-या क्रमांकावर पोहोचलो आहोत. पहिले यूएसए, दुसरे चायना आणि मग भारताचा नंबर लागतो. आपण वाहन उद्योग क्षेत्रात भरारी घेत आहोत, असे गडकरी यांनी या बाईक लाँंिचग सोहळ््याप्रसंगी सांगितले.