कँडी : अचूक गोलंदाजी आणि यशस्वी जैस्वालच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी श्रीलंकेला दुस-या टी-२० सामन्यात पराभूत केले. या विजयासह भारताने ही टी-२० मालिका जिंकली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १६१ धावा केल्या होत्या. भारतीय डावाला सुरुवात झाली आणि पाऊस आला. त्यामुळे भारताला डकवर्थ लुईस नियमांनुसार ८ षटकांत ७८ धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर संजू सॅमसन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण यशस्वी जैस्वाल दमदार फटकेबाजी करत होता. त्यामुळे डकवर्थ लुइस नियमानुसार भारताने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
यशस्वीने या सामन्यात फक्त १५ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३० धावांची तडाखेबंद खेळी साकारली. भारतापुढे विजयासाठी १६२ धावांचे आव्हान होते. पण भारताचा डाव सुरु झाला आणि पहिल्याच षटकात पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर भारताला विजयासाठी ८ षटकांत ७८ धावांचे आव्हान देण्यात आले होते. संजू सॅमसन यावेळी पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. पण दुसरीकडे यशस्वी जैस्वाल हा धडाकेबाज फलंदाजी केली.