भारताने खाते उघडले, १० मीटर पिस्टलमध्ये केली कमाई
पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी भारताने आपले पदकांचे पहिले खाते उघडले. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक पटकावले. तब्बल १२ वर्षांचा दुष्काळ संपवत मनू भाकरने भारताला पदक मिळवून दिले. ती या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी देशातील पहिली महिला नेमबाज ठरली. त्यानंतर देशभरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मनूचे अभिनंदन केले.
मनू भाकरने शनिवारीच महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात पात्रता मिळवली होती. आज अंतिम सामन्यात प्रारंभी मनू भाकरने अव्वल स्थान गाठले होते. पण शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचेपर्यंत ती दोन्ही कोरियन नेमबाजांपेक्षा मागे पडली आणि तिस-या क्रमांकावर राहिली. पण मनू शेवटपर्यंत रौप्य पदकाच्या लढतीत होती. मात्र, तिचे रौप्य पदकाचे लक्ष्य ०.१ ने हुकले. त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. तिने १२ वर्षांनंतर नेमबाजीतील पदकाचा दुष्काळ संपविला आहे. या अगोदर २०१२ मधील लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार या नेमबाजांनी पदक मिळविले होते. तत्पूर्वी अॅथेन्समध्ये २००४ मध्ये राज्यवर्धन राठोडने तर २००८ मध्ये बीििजंग येथे अभिनव बिंद्राने नेमबाजीत पदक मिळविले होते. त्यामुळे नेमबाजीतील हे ५ वे ऑलिम्पिक पदक ठरले. या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मनू भाकरचे अभिनंदन केले. भारताला तुझ्याबद्दल अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले.