ट्रम्प यांच्यावर गोळीबार, बालंबाल बचावले

yongistan
By - YNG ONLINE
कानाला चाटून गेली गोळी, बालंबाल बचावले, ऐन निवडणुकीत राजकारण पेटले
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करून हत्येचा प्रयत्न झाल्याने जगभरात खळबळ उडाली. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या बाजूने गोळी घासून गेली. गोळी लागताच ट्रम्प खाली बसले. त्यांचा चेहरा रक्ताने काहीसा माखला. पण नंतर ट्रम्प यांनी मूठ आवळून निश्चयी असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, सुरक्षा जवानांनी हल्लेखोराचा जागेवरच खात्मा केला. ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ते सुरक्षित आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे ४ वाजता ही घटना घडली. तेव्हा अमेरिकेत शनिवारी संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील बटलर शहरात ट्रम्प निवडणूक रॅली करत होते. त्यावेळी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. गोळीबाराचा आवाज येताच एकच आक्रोश निर्माण झाला. त्यावेळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागावरून गोळी घासून गेली. एका क्षणात ट्रम्प खाली बसले. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना रिंगण करून बाजूला केले. तेव्हा कान आणि चेहरा रक्ताने माखलेला होता. अवघ्या १२ सेकंदात हा प्रकार घडला.

५२ वर्षांनंतर उमेदवारावर हल्ला
अमेरिकेत ५२ वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर हल्ला झाला. यापूर्वी १९७२ मध्ये जॉर्ज सी वॉलेस यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते. एका शॉंिपग सेंटरमध्ये त्याच्यावर गोळ््या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर ते मरेपर्यंत व्हील चेअरवरच राहिले. १९७२ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे भाऊ रॉबर्ट एफ केनेडी यांच्यावर हल्ला झाला होता.