भारताने जिंकली झिम्बाब्वे विरूद्ध मालिका

yongistan
By - YNG ONLINE
यंग ब्रिगेडने अखेरचा सामनाही घातला खिशात

हरारे : वृत्तसंस्था
भारताची युवा ब्रिगेड रविवार, दि. १४ जुलै रोजी झिम्बाब्वेविरुद्ध पाचवा टी-२० सामना खेळली. हरारे स्पोर्टस् क्लबवर हा सामना रंगला. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेला १६८ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला केवळ १२५ धावाच करता आल्या. त्यामुळे अखेरचा सामना जिंकत टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध मालिका ४-१ ने जिंकली.
लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवातीलाच घसगुंडी झाल्याने झिम्बाब्वेची अवस्था बिकट झाली. एकानंतर एक फलंदाज बाद होत गेल्याने अखेरच्या सामन्यात यजमान संघाला हार पत्करावी लागली. पाच सामन्यात झिम्बाब्वेने पहिलाच सामना जिंकला. त्यानंतर चारही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 
एक चेंडू, १३ धावा
भारत-झिम्बाब्वेमधील अखेरच्या सामन्यात यशस्वी जैस्वाल ५ चेंडूत १२ च धावा करू शकला. परंतु त्याच्या नावावर आगळावेगळा विक्रम नोंदला गेला. जैस्वालने सामन्यात कर्णधार सिकंदर रझाच्या पहिल्याच फुलटॉस चेंडूवर षटकार ठोकला. परंतु पंचांनी रझाचा पहिला चेंडू नोबॉल ठरविला. त्यामुळे भारतीय संघाला फ्री हिट मिळाला. या चेंडूवरही जैस्वालने षटकार ठोकला. त्यामुळे एकाच लिगल चेंडूवर त्याने १३ धावा केल्या. त्यामुळे त्याच्या नावावर नवा विक्रम नोंदला गेला.