प्रतिकूल परिस्थितीतून जीवन प्रवास
लंडन : भारताचे जावई ऋषी सुनक यांची कंझर्व्हेटिव्ह पार्टी निवडणुकीच्या निकालात पिछाडीवर पडली. त्यामुळे लेबर पार्टीचे नेतृत्व करीत असलेले केयर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत.
६१ वर्षीय केयर स्टार्मर हे लेबर पार्टीचे नेते आहेत. त्यांचा जन्म २ सप्टेंबर १९६२ रोजी ऑक्स्टेड, सरे येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांची आई नर्स होती. त्या संधिवाताने ग्रस्त होत्या. केयर स्टार्मर यांचे वडील टूल बनविण्याचे काम करीत होते. केयर स्टार्मर यांनी रिगेट ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतले. युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलेले केयर स्टार्मर त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते. राजकारणात येण्यापूर्वी ते वकील म्हणून काम करीत होते. ते ब्रिटनमधील मानवाधिकार प्रकरणातील प्रसिद्ध वकिल होते. त्यांनी लीडस् युनिव्हर्सिटीत कायद्याचे शिक्षण घेतले.
स्टार्मर यांनी १९८७ मध्ये बॅरिस्टर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी २०१५ मध्ये संसदेत प्रवेश केला आणि २०२० मध्ये लेबर पार्टीचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला सत्ता मिळविण्यात यश आले. १४ वर्षांनंतर ब्रिटनमध्ये लेबर पार्टी पुन्हा सत्तेत येत आहे. केयर स्टार्मर यांनी वित्तीय जबाबदारी सांभाळून सार्वजनिक सेवा पुन्हा सुरू करण्याचा दावा केला आहे. त्यांची एकूण संपत्ती ७.७ मिलियन पौंड आहे. १० पौंड मिलियन किमतीची जमीन आहे. १९८६ मध्ये वकील असताना ती खरेदी केली होती. ऋषी सुनक यांच्या तुलनेत त्यांची संपत्ती कमीच आहे.