पल्लेकेले : वृत्तसंस्था
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवार, दि. ३० जुलै २०२४ रोजी पल्लेकेले येथे खेळला गेला. सुपर ओव्हरमध्ये पोहोचलेला सामना टीम इंडियाने जिंकला आणि मालिका ३-० ने जिंकली. त्यामुळे श्रीलंकेला धक्का बसला. सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरने सलग दोन विकेट घेतल्याने केवळ २ धावांवरच परतावे लागले. त्यामुळे भारताने सहज विजय मिळविला.
तिस-या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकली. पावसामुळे सामन्याला उशीर झाला. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकात ९ विकेट गमावत १३७ धावा केल्या. या सामन्यात आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. एकवेळ टीम इंडियाची धावसंख्या ८.४ षटकात ५ गडी बाद ४८ धावा अशी होती. येथून शुभमन गिल आणि रियान पराग यांनी धुरा सांभाळली. दोन्ही खेळाडूंनी सहाव्या विकेटसाठी ४० चेंडूत ५४ धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकांमध्ये वॉशिंग्टन सुंदरने १८ चेंडूत २५ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. पण श्रीलंकेनेही जोरदार प्रत्युत्तर देत सामना बरोबरीत सोडविला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यात श्रीलंकेने भारतासमोर ३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पहिल्या चेंडूवर श्रीलंकेला एक रन वाईडवर मिळाला. यानंतर कुसल मेंडिसने एक धाव घेतली. दुस-या चेंडूवर सुंदरने परेराला बाद केले. स्कोअर २/१ होता. सुंदरने तिस-या चेंडूवर निसांकाला बाद केले. अशाप्रकारे श्रीलंकेने केवळ दोन धावा केल्या. त्यानंतर भारताने ४ धावा करून सामना जिंकला.