मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तशा आशयाचे पत्रक राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने मंगळवार दि. ३० जुलै २०२४ रोजी जारी केले आहे. पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्वागत केले आहे. राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू केला आहे. परंतु त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही, याचा विचार करून हे पुढचे पाऊल टाकण्यात आल्याचे समजते.
पोलिस महासंचालकांनी थेट यासंबंधी पत्र जारी करून सर्वच पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, भारतात प्रथमच झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत पोलिसांनी उचललेले पाऊल पथदर्शी आहे. महाराष्ट्रातून जादूटोणा, बुवाबाजीला हद्दपार करण्यासाठी ते उपयुक्त पाऊल ठरेल, अशी माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी दिली.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने घेतलेली भूमिका पुरोगामी महाराष्ट्राला साजेशी आहे. यासाठी अंनिसने सलग अठरा वर्षे सातत्याने विविध आंदोलने, लढे उभे केले होते.