काश्मिरात ३ टप्प्यांत, हरियाणात १ टप्प्यात निवडणूक
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षानंतर प्रथमच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मिरात १९ सप्टेंबर २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा ३ टप्प्यांत निवडणुका होणार आहेत तर हरियाणात एकाच टप्प्यात म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, ४ ऑक्टोबरला दोन्ही विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी जम्मू-काश्मीरमधील ९० जागांसाठी ३ टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. राज्यात ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवण्यात आले होते. जम्मू-काश्मीर विधानसभेत ८७ जागा असून २०१४ मध्ये पीडीपीने २८, भाजपने २५, नॅशनल कॅन्फरन्सने १५, काँग्रेसने १२ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा भाजप आणि पीडीपीने मिळून सरकार स्थापन केले होते. त्यावेळी मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री झाल्या होत्या. जानेवारी २०१६ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर ४ महिने राज्यपाल शासन लागू झाले आणि नंतर मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्री झाल्या. मात्र, हे सरकार जास्त दिवस टिकले नाही. १९ जून २०१८ रोजी भाजपने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात राज्यपाल शासन सुरू झाले.
हरियाणात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ९० पैकी सर्वाधिक ४० जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी ४६ जागांची गरज होती. काँग्रेसने ३१ तर जननायक जनता पार्टीने १० जागांवर विजय मिळवला होता. भाजपने जेजेपी आणि अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री झाले होते. यावेळी हरियाणातील सर्व जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात १ ऑक्टोबर रोजी मतदान होईल आणि ४ ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. ९० सदस्य संख्या असलेल्या हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.
काश्मिरात ३ टप्प्यांत निवडणुका
पहिला टप्पा : १९ सप्टेंबर
दुसरा टप्पा : २५ सप्टेंबर
तिसरा टप्पा : १ ऑक्टोबर