नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगातील सर्वांत श्रीमंत अब्जाधीश उद्योगपतींची यादी जाहीर करणा-या ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने जारी केलेल्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत लोकांना मोठा झटका बसला असून, त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी एका दिवसात १५.२ अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली. इलॉन मस्कनंतर बेझोस हे दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योगपती आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही घट झाली आहे.
जेफ बेझोससह इतर अब्जाधीशांच्या संपत्तीतही प्रचंड घट झाली. ब्लूमबर्गच्या डेटावर नजर टाकली तर टॉप २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत सातत्याने घट होत आहे. जगातील ५०० सर्वांत श्रीमंत लोकांच्या संपत्तीत १३४ अब्ज डॉलरची घट झाल्याचे निर्देशांकांत उघड झाले आहे. अमेरिकेतील साप्ताहिक बेरोजगारी दराची आकडेवारी कमकुवत झाल्यानंतर भारतासह जगभरातील बाजारपेठांना घसरणीचा सामना करावा लागला.
अमेरिकन शेअर बाजार नासडाक १०० निर्देशांक २.४ टक्क्यांनी घसरला होता. या काळात अमॅझॉनचे शेअर्स देखील ८.८ टक्क्यांनी घसरले. ज्यामुळे जेफ बेझोसची संपत्ती १५.२ बिलियन डॉलरपर्यंत कमी झाली. जेफ बेझोस यावर्षी अमेझॉनचे शेअर्स सतत विकत आहेत.