पुणे : प्रतिनिधी
मराठी मनोरंजन विश्वामधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपट गाजवणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन झाले. २७ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. बुधवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गेली अनेक दशके त्यांनी मराठी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. सुहासिनी देशपांडे ६५ वर्षांहून अधिक काळ सिनेविश्वात कार्यरत होत्या असून त्यांनी १०० हून अधिक सिनेमात काम केले आहे. त्यांच्या निधनाने मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वाचे न भरून निघणारे नुकसान झाले. मराठी मालिकांमध्येही त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आणि मराठीसह हिंदीमध्येही उल्लेखनीय काम केले होते. २०११ साली आलेल्या सिंघम सिनेमामध्येही त्यांनी भूमिका साकारली होती.
मराठी सिनेविश्वात त्यांनी मानाचं कुंकू (१९८१), कथा (१९८३), आज झाले मुक्त मी (१९८६), आई शप्पथ (२००६), चिरंजीव (२०१६), धोंडी (२०१७), छंद प्रीतीचा (२०१७), बकाल (२०१९) या सिनेमांमध्ये काम केले आहे. रोहित शेट्टीचा सिंघम हा त्यांचा शेवटचा हिंदी सिनेमा होता. सुहासिनी देशपांडे यांनी अवंतिकासारख्या लोकप्रिय मालिकेतही काम केले होते.