जय शाह आयसीसीचे सचिव

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे अध्यक्ष होणार आहेत. आयसीसीच्या चेअरमन पदासाठी शाह यांनी मंगळवार, दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी अर्ज करणारे एकमेव अर्जदार जय शाह होते. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली. येत्या १ डिसेंबर २०२४ पासून जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. २७ ऑगस्ट ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. ३५ वर्षीय जय शाह हे पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत.
आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यांनी सलग दुस-यांदा हे पद भूषवले. त्यांनी तिस-या टर्मच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले. त्यानंतर आयसीसीमध्ये जय शाह यांचा अध्यक्षपदासाठी दावा खूप मजबूत मानला जात होता. जय शाह यांनी बीसीसीआयचे सचिव म्हणून भारतीय क्रिकेटला वेगळ््या पातळीवर नेऊन ठेवले. आता त्यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्याचा फायदा भारतीय क्रिकेटलाही नक्कीच होईल, असे सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. शाह हे आयसीसी बोर्डातील सर्वात प्रभावशाली चेह-यांपैकी एक मानले जातात. ते सध्या आयसीसीच्या शक्तिशाली वित्त आणि व्यावसायिक व्यवहार उप-समितीचे प्रमुख आहेत.
जय शाह चौथे भारतीय
जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होणारे चौथे भारतीय आहेत. यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार आणि शशांक मनोहर हे आयसीसीच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले होते. त्यानंतर आता जय शाह यांचा क्रमांक लागला आहे.