सिंधूचे तिसऱ्यांदा पदकाचा स्वप्न भंगले

yongistan
By - YNG ONLINE
पॅरिस : भारताची अव्वल बॅटमिंटनपटू आणि देशाला सलग दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकून देणा-या पीव्ही सिंधूला गुरुवार, दि. १ ऑगस्ट रोजी पराभवाचा धक्का बसला. महिला एकेरीत राउंड ऑफ १६ च्या लढतीत सिंधूचा चीनच्या बिंग जाओशीने पराभव केला. विशेष म्हणजे २०२० साली झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये याच जाओशीचा पराभव करून सिंधूने कांस्यपदक जिंकले होते. 

चार वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे १ ऑगस्ट २०२० रोजी टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने बिंग जाओशीचा पराभव करून दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकले होते. त्याच जाओशीने सिंधूचा पराभव केला. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर पदकाशिवाय परत येण्याची सिंधूची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यावेळी पदक जिंकून देशाला सलग ३ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी पहिली खेळाडू होण्याची संधी तिला होती. परंतु तिचा स्वप्नभंग झाला.

उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी सिंधूला दुस-या गेममध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे गरजेचे होते. मात्र दुस-या गेममध्ये बिंग जाओशीने अधिक आक्रमक खेळ केला आणि सुरुवातीपासून आघाडी मिळवली आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.