भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत

yongistan
By - YNG ONLINE
ब्रिटनला दिला धक्का, उपांत्यपूर्व सामन्यात पराभव 
पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने रविवार, दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पेनल्टी शुटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले आणि थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला.  दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी केल्याने मॅचचा निकाल पेनल्टी शुटआऊटद्वारे लावण्यात आला. भारताचा गोलकीपर श्रीजेशने जोरदार बचाव केल्याने आणि भारताच्या हॉकी खेळाडूंनी पेनल्टी शुटआऊटमध्ये ४ गोल केल्याने ब्रिटनला पराभवाचा धक्का बसला. भारताची उपांत्य फेरीतील लढत आता ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. 
ग्रेट ब्रिटन आणि भारत यांच्यातील मॅचमधील पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पहिल्या क्वॉर्टरनंतर भारताच्या अमित रोहिदास याला रेड कार्ड देण्यात आले. त्यामुळे तो बाहेर गेला. त्यानंतर भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंगने एक गोल केला. त्यानंतर ब्रिटनच्या ली मॉर्टनने गोल केल्याने १-१ अशी बरोबरी झाली. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही. पुढच्या दोन्ही क्वॉर्टरमध्ये भारताच्या बचाव फळीने आणि गोल कीपर श्रीजेशने बचाव करत ब्रिटनचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. अखेर मॅच पेनल्टी शुट आऊटमध्ये गेली. तिथे भारताने ब्रिटनला ४-२ असे पराभूत केले.