भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह असा उल्लेख केला जाणा-या आणि स्पेस रिसर्चच्या (अवकाश संशोधन ) क्षेत्रात भारताला ‘स्पेस’ मिळवून देणा-या विक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका संपन्न कुटुंबात १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव विक्रम अंबालाल साराभाई असे होते. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. शिवाय ब-याच राजकीय व्यक्तींशी त्यांचे संबंध असल्याने त्या लोकांचे (रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू , महात्मा गांधी) त्यांच्या घरी जाणे-येणे होते. त्यामुळे खरंतर विक्रम साराभाईंना उद्योग क्षेत्रात अथवा राजकारणात जम बसवण्यासाठी पोषक वातावरण होते.आपले बारावीपर्यंतचे शिक्षण आटोपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विश्वविद्यालय येथे शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ मध्ये नोबेल पुरस्कार विजेते सर सी. ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कॉस्मिक किरणां’वर संशोधन केले. १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर ते ब्रिटनमध्ये परत गेले. १९४७ साली त्यांनी ‘कॉस्मिक रे इन्व्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटीट्यूड्स’ वर संशोधन करून पीएच. डी. पदवी मिळवली. आणि त्याच वर्षी आपल्या या भारतभूमीच्या सेवेसाठी ते आपल्या मायदेशी परत आले. पुढे जाऊन अवकाश संशोधनात त्यांनी जे कार्य केले त्याबद्दल काही सांगायला नकोच. डॉ. विक्रम साराभाई यांच्या अथक परिश्रमानंतरच १९६९ साली भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्त्रो) स्थापना झाली. आयआयएम अहमदाबादच्या स्थापनेतही डॉ. विक्रम साराभाई यांची मुख्य भूमिका होती. होमी भाभा यांच्या मृत्यूनंतर ते १९६६ मध्ये परमाणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची अध्यक्षपदे त्यांच्याकडे होती