कुस्तीत पदक निश्चित, नीरज चोप्राही अंतिम फेरीत
पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पैलवान विनेश फोगट आणि क्यूबाची पैलवान युस्नेलिस गुझमान यांच्यात ६ ऑगस्ट २०२४ रोजी उपांत्य फेरीची लढत पार पडली. ५० किलो महिला फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात विनेश फोगटने उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्यानंतर रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत तिने वाय. गुझमानला ५-० असे पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. ऑलिम्पिक स्पर्धेत ५० किलो वजन गटात अंतिम फेरीत धडक मारून इतिहास घडविला. कारण आतापर्यंत एकाही भारतीय महिला कुस्तीपटूला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. दरम्यान, भालाफेकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरी गाठली आहे. हेदेखील पदक निश्चित मानले जात आहे.
विनेश फोगटने सुरुवातीपासून आक्रमकपणे खेळ सुरू केला होता. वाय. गुझमान बचावात्मक खेळ करत होती. त्यामुळे तिला ३० सेकंदांचा वेळ देण्यात आला होता. त्यातदेखील ती गुण मिळवू शकली नाही. त्यामुळे विनेश फोगटला पहिला गुण मिळाला. मॅचच्या पूर्वार्धात विनेश फोगट १-० ने आघाडीवर होती. मॅचच्या दुस-या टप्प्यात क्यूबाच्या वाय. गुझमानने पलटवार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विनेश फोगटला ३० सेकंदांचा वेळ गुण घेण्यासाठी देण्यात आला. यामध्ये विनेश फोगटने २ गुण घेत ३-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा २ गुण मिळवत विनेशने ५-० अशी आघाडी मिळवत थेट अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे कुस्तीत भारताचे पदक निश्चित झाले आहे.
तत्पूर्वी ६ ऑगस्ट २०२४ रोजीच पहिल्याच सामन्यात धक्कादायक निकाल नोंदविताना टोकियोतील सुवर्णपदक विजेती युई सुसाकीला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकाही सामन्यात पराभूत न झालेल्या युई सुसाकीला विनेश फोगटने पराभूत केले. सुसाकीने ऑलिम्पिकमध्ये जपानला दोनवेळा सुवर्ण पदक मिळवून दिले होते. या वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकीचा ३-२ असा पराभव केला होता. त्यानंतर काही वेळात उपांत्यपूर्व फेरीत यूक्रेनच्या ओकासाना लिवाच हिचा ७-५ असा पराभव करत विनेश फोगटने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत क्युबाच्या वाय. गुझमानचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली.
नीरजलाही सुवर्ण?
भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकला आणि त्याने थेट अंतिम फेरीत स्थान पटकावले. त्यामुळे नीरजही सुवर्णपदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.