नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत-बांगला देशात गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय संबंध आहेत. २००९ मध्ये शेख हसीना सत्तेवर आल्यापासून भारत आणि बांगलादेशचे मैत्रीपूर्ण संबंध वाढले. परंतु शेख हसिना यांना पायउतार व्हावे लागल्याने दोन्ही देशातील संबंधावर विपरित परिणाम होणार आहे.
व्यापाराच्या दृष्टीने बांगलादेश हा दक्षिण आशियातील भारताचा सर्वात मोठा भागीदार आहे आणि चीननंतर भारत बांगलादेशचा दुसरा सर्वात मोठा भागीदार आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार १३ अब्ज डॉलर्स इतका होता, असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले.
कोरोना काळातदेखील दोन्ही देशांत १०.७८ अब्ज डॉलर्स इतका व्यापार झाला होता. भारतातील कापसाची सर्वाधिक निर्यात बांगलादेशात होते. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताच्या एकूण कापूस निर्यातीपैकी ३४.९ टक्के कापूस निर्यात बांगलादेशला करण्यात आली, ज्याची अंदाजे किंमत २.४ अब्ज डॉलर्स इतकी आहे. भारतातून बांगलादेशमध्ये पेट्रोलियम उत्पादने आणि तृणधान्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताने बांगलादेशातून रेडिमेड कपड्यांची आयात केली, ज्याची रक्कम ३९१ दशलक्ष डॉलर्स होती. अलीकडच्या काही वर्षांत बांगलादेश हे कापड उद्योगाचे प्रमुख जागतिक केंद्र म्हणून उदयास आले आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये भारत आणि बांगलादेशने ढाका येथे व्यापारावरील संयुक्त कार्यगटाच्या एका बैठकीदरम्यान मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू केली. मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि बांगलादेशदरम्यान व्यापार केलेल्या वस्तूंवरील सीमा शुल्क कमी होईल किंवा पूर्णपणे काढून टाकण्यात येईल, तसेच नियम सुलभ करण्यात येणार होते.
पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीमुळे भारत-बांगलादेश संबंध अधिक मजबूत झाले आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितले. रस्ते, रेल्वे, जहाजबांधणी आणि बंदर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भारताने २०१६ पासून बांगलादेशला तीन वेळा आठ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये अखौरा-अगरतळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लिंक आणि खुलना-मोंगला पोर्ट रेल्वे लाईन या दोन संयुक्त प्रकल्पांचे उदघाटन करण्यात आले. रेल्वेव्यतिरिक्त सध्या भारत आणि बांगलादेशदरम्यान पाच कार्यरत बस मार्ग आहेत; ज्यात कोलकाता, आगरतळा आणि गुवाहाटी ते ढाका या शहरांना जोडर्णाया मार्गांचा समावेश आहे.
२०२३ मध्ये बांगलादेशने भारत आणि ईशान्येकडील मालवाहतूक सुलभ करण्यासाठी चितगाव आणि मोंगला बंदरांच्या वापरासाठीच्या भारताच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली होती. गेली साधारण १५ वर्षे शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्यांच्या काळात बांगलादेशचे भारताबरोबरचे संबंधही अत्यंत चांगले राहिले आहेत. त्यांनी पदावरून पायउतार होणे म्हणजे भारताने बांगलादेशमधील एक विश्वासू सहकारी गमावला आहे. शेख हसीना यांचा भारताशी चांगला स्रेह होता आणि बांगलादेशातून कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांचा सामना करण्यासाठी भारताने त्यांच्यासोबत फार जवळून काम केले आहे.
बांगलादेशमध्ये नव्याने जी सत्ता स्थापन होईल, ती काय भूमिका घेईल याबाबत भारताला चिंता असेल. भूतकाळामध्ये बांगलादेशमधील विरोधी पक्ष बीएनपी-जमात अथवा सैन्याची सत्ता बांगलादेशावर होती, तेव्हा भारताला फार चांगला अनुभव आलेला नाही. त्या काळात भारत-बांगलादेश सीमेवर भारतविरोधी दहशतवादी संघटना कार्यरत होत्या. अशाच प्रकारची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवण्याची शक्यता आहे. हे भारतासाठी महागात पडणार आहे.