पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

yongistan
By - YNG ONLINE
-आरती अंकलीकर-टिकेकर, प्रकाश बुध्दीसागर, शुभदा दादरकर यांचाही जीवन गौरव पुरस्काराने सन्मान 

मुंबई :  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार मंगळवार, दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर झाले असून सन २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. या सोबतच शास्त्रीय संगीतासाठीचा पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला. या शिवाय विविध क्षेत्रांसाठीच्या जीवन गौरव आणि १२ राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणाही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.
राज्य शासनाद्वारे देण्यात येणा-या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समिती या पुरस्कारांची शिफारस करत असते. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला. शास्त्रीय संगीतासाठी जीवन समर्पण करणा-या कलाकारांच्या योगदानाबद्दल दिला जाणारा सन २०२४ च्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला. यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार प्रकाश बुध्दीसागर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार श्रीमती शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे.  
संजय महाराज यांनाही पुरस्कार
संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल सन २०२४ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे तर २०२३ च्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कारासाठी शशिकला झुंबर सुक्रे यांची व  २०२४ च्या पुरस्कारासाठी जनार्दन वायदंडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.