मराठमोळ्या स्वप्निलची कांस्यपदकावर मोहोर

yongistan
By - YNG ONLINE
ऑलिम्पिकमधील ३ रे पदक, कौतुकाचा वर्षाव
पॅरिस : वृत्तसंस्था
भारताचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये ४५१.४ गुण नोंदवून १ ऑगस्ट २०२४ रोजी इतिहास रचला. त्याने करिष्मा करत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे पहिला भारतीय ठरला. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. यापूर्वी मनूने वैयक्तिक आणि सरबज्योत सिंगसोबत सांघिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. दरम्यान, रेल्वेत टीसी असलेल्या स्वप्निलचे प्रमोशन करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.
स्वप्नील कुसाळेने डावाची संथ सुरुवात केली. त्याने १५३.३ (पहिली मालिका-५०.८, दुसरी मालिका-५०.९, तिसरी मालिका-५१.६) गुणांसह तो सहाव्या क्रमांकावर राहिला. यानंतर प्रोनमध्ये त्याने १५६.८ (पहिली मालिका-५२.७, दुसरी मालिका-५२.२, तिसरी मालिका-५१.९) स्कोअर करून आपली स्थिती सुधारली. प्रोननंतर तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता. येथून स्वप्नीलने चमत्कार करण्यास सुरुवात केली.
क्रमवारीत स्वप्नील कुसाळेने पहिल्या मालिकेत ५१.१ आणि दुस-या मालिकेत ५०.४ म्हणजेच एकूण १०१.५ गुण मिळवले. म्हणजेच त्याचा एकूण स्कोअर ४२२.१ होता आणि तो तिस-या स्थानावर पोहोचला. येथून पुढेही आव्हान आणखी गंभीर होते. परंतु स्वप्नीलने मागे वळून पाहिले नाही. एलिमिनेशनमध्ये त्याने शानदार पद्धतीने कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेचे सुवर्ण चीनच्या लियू युकुनने जिंकले तर रौप्य पदक कुलिस सेरीला मिळाले. 
 मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. तिने रविवारी १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकून पदकतालिकेत भारताचे खाते उघडले. त्यानंतर मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने मंगळवारी मिश्र सांघिक स्पर्धेतही कांस्यपदक पटकावले. आता पॅरिस ऑलिम्पिकच्या पदक विजेत्यांमध्ये स्वप्नील कुसाळेचेही नाव जोडले गेले आहे.  
खाशाबा जाधवनंतर स्वप्निलचे कांस्य
१९५२ साली हेलंसिकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या खाशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर ७२ वर्षांनी कोल्हापूरच्या खेळाडूने देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिले. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तीक पदक जिंकणारा तो महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू ठरला. देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारे महाराष्ट्रातील दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे ठरले आहेत.
राज्य सरकार देणार 
एक कोटीचे बक्षीस
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणा-या नेमबाज स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारने एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे बक्षीस जाहीर केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करीत शुभेच्छा दिल्या. तसेच फोन करून अभिनंदनही केले.