पदकसंख्या पोहाचेली ६ वर
पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पॅरालिम्पियन प्रीती पालने कमाल करीत रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी इतिहास रचला असून, महिला गटातील २०० मीटर टी ३५ अंतिम फेरीत ३०.०१ सेकंद अशी वेळ नोंदवित तिने तिस-या क्रमांकासह कांस्य पदकाला गवसणी घातली.
पहिल्यांदा पॅरालिम्पिक स्पर्धेत उतरणा-या प्रीतीने या आधी १०० मीटर टी ३५ प्रकारात कांस्य पदक पटकावले होते. मैदानी खेळात भारताला पदक मिळवून देणा-या या महिला धावपटूने आता एका पॅरालिम्पिकमध्ये दोन पदक जिंकण्याचा महापराक्रम करून दाखविला.
पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेतील दुस-या पदकासह प्रीतीने भारताच्या खात्यात सहाव्या पदकाची नोंद केली. या आधी भारताकडून अवनी लेखरा (सुवर्ण), मोना अग्रवाल (कांस्य) यांनी १० मीटर एअर रायफल (एसएच १) प्रकारात भारताला पदकाची कमाई करून दिली. त्यानंतर नेमबाज मनीष नरवाल याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात रौप्य पदक पटकावले. रुबिना फ्रान्सिसने महिला गटातील १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात कांस्य पदक पटकावले. नेमबाजांच्या ४ पदकांसह प्रीतीने १०० मीटरसह २०० मीटर शर्यतीत २ कांस्य पदके पटकावली.