भारताच्या खात्यात आणखी दोन पदके

yongistan
By - YNG ONLINE
पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदकसंख्या २९ वर
पॅरिस : वृत्तसंस्था
भारताने अ‍ॅथलेटिक्समध्ये शनिवार, दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी २ पदकांची कमाई केली. भारताला भालाफेक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकण्याची संधी होती. भारताचा नवदीप आघाडीवर होता. पण अखेरच्या क्षणी त्याने आघाडी गमावली आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या सिमरनने कांस्यपदक पटकावले. या दोन पदकांसह भारताने एकूण २९ पदके पटकावली आहेत. 

भारताच्या खात्यात ६ गोल्ड मेडल आहेत. सोबत १० रौप्यपदके आणि १३ कांस्यपदकांचीही कमाई केली. त्यामुळे २९ पदकांसह भारताने पदकतालिकेत आघाडी घेत १८ वे स्थान पटकावले आहे. भारताच्या नवदीपची सुरुवात चांगली झाली नाही. त्याला पहिल्या भालाफेकीत एकही गुण मिळाला नाही. पण दुस-यांदा ४६.३९ एवढ्या अंतरावर भाला फेकला. त्यानंतर तिसरा प्रयत्न फसला. पण चौथ्या प्रयत्नात त्याने ४७.३२ मीटर लांब भाला फेकला आणि तो पहिल्या क्रमांकावर आला. त्यावेळी आशा उंचावल्या. पण त्यानंतर इराणच्या सादेहने ४७.६४ मीटर अंतर भाला फेकला. त्यानंतर नवदीपकडे अजून एक संधी होती. पण त्याच्याकडून पुन्हा चूक झाली. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सिमरनने पटकावले कांस्य
महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सिमरनने तिसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे तिला कांस्यपदक मिळाले. सिमरनने सुरुवातीला आघाडी घेतली. पण त्यानंतर ती पिछाडीवर पडली. त्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.