प्रवीणकुमारची गोल्डन कामगिरी
पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकांची लयलूट सुरूच असून, शुक्रवार, दि. ६ सप्टेंबर २०२४ रोजी भारताच्या प्रवीण कुमारने उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत तिरंगा फडकवला. या स्पर्धेत प्रवीण सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत होता. अखेरच्या टप्प्यात प्रवीणने दमदार कामगिरी करीत २.०८ अंतर उडी मारून सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताचे हे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील सहावे गोल्ड मेडल आहे.
भारताने पहिले गोल्ड मेडल नेमबाजीत पटकावले होते. त्यानंतर बॅडमिंटन, तिरंदाजी अशा खेळांत भारताने प्राविण्य दाखवले. ज्युडोसारख्या खेळातही भारताने मेडल मिळवले. अॅथलेटिक्समध्येही भारत मागे नव्हता. आता उंच उडी स्पर्धेत भारताने प्रथमच गोल्ड मेडल जिंकले आणि इतिहास रचला. या सुवर्णपदकामुळे भारताला पदकतालिकेत फायदा झाला. कारण पाचव्या सुवर्णपदकाच्या वेळी भारत १७ व्या स्थानी होता. आता सहावे गोल्ड मेडल पटकावल्यानंतर भारत १३ व्या स्थानावर पोहोचला. भारताची ही सर्वात उजवी कामगिरी ठरली. कारण भारताने प्रथमच ६ गोल्ड मेडल्स पटकावले. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही गोल्ड मेडल जिंकता आले नाही. या पॅरालिम्पिकमध्ये तब्बल ६ सुवर्णपदके पटकावली आहेत.
भारताची पदकसंख्या २६ वर
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी सरस कामगिरी करीत आतापर्यंत ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि ११ कांस्य पदके अशी एकूण २६ पदके पटकावली आहेत. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी ५ सुवर्णांसह १९ पदके जिंकली होती.
हरविंदर, प्रीती ध्वजवाहक
पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेची सांगता रविवार, दि. ८ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यासाठी सुवर्णपदक विजेता तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांची समारोप सोहळ््यात भारतीय पथकाचे ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली. हरविंदरने भारताला तिरंदाजीच सुवर्णपदक जिंकवून दिले. प्रीतीने भारताला दोन कांस्यपदके मिळवून दिली.