नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. रामसुब्रमण्यन यांची सोमवार, दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नियुक्तीची घोषणा केली. माजी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यन जून २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आहेत.
अरुणकुमार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर १ जून २०२४ पासून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. यासाठी चंद्रचूड यांच्या नावाचीही चर्चा होती. न्या. रामसुब्रमण्यन यांनी मद्रास उच्च न्यायालयात २३ वर्षे वकिली केली. त्यानंतर २००६ मध्ये मद्रास उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आणि २००९ मध्ये कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून काम केले. त्यानंतर हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आणि २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि २०२३ मध्ये ते निवृत्त झाले होते.