सीरियात बंड, असादची सत्ता संपुष्टात

yongistan
By - YNG ONLINE
दमास्कस : वृत्तसंस्था 
सीरियामध्ये अबू महंमद अल गोलानी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरांनी रविवार, दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे राजधानी दमास्कसचा ताबा घेत अध्यक्ष बाशर अल असाद यांचे सरकार उलथवून टाकले. बाशर अल असाद हे देशाबाहेर पळून गेल्याचा दावा बंडखोरांनी केला. देशातील जनतेने या बदलाचे स्वागत केले. देशाचे नेतृत्व गोलानी हाच करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सरकारी फौजांविरोधात आक्रमक झालेल्या बंडखोरांनी पहाटे वेगवान आक्रमण करीत राजधानी दमास्कसचा ताबा घेतला. बंडखोरांच्या हल्ल्यामुळे अध्यक्ष बाशर अल असाद यांचे सरकार उलथून पडले असून, असाद कुटुंबीयींची या देशावरील ५० वर्षांपासूनची पोलादी पकडही सुटली आहे. मात्र, या ताज्या घडामीेडीेंमुळे मागील अनेक वर्षांपासून आर्थिक-राजकीय अस्थैर्यात असलेल्या सीरियामध्ये आणखी अराजकता पसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बाशर अल असाद हे देशाबाहेर पळून गेल्याचा दावा बंडखोरांनी केला. 

महिनाभरापासून सुरु होती आगेकूच
देशाच्या नैऋत्य भागावर ताबा असलेल्या बंडखोरांवर सरकारी फौजांकडून हल्ले होत असल्याने या बंडखोरांनी मागील महिन्यापासून एक-एक शहर ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. त्यांना फारसा विरोध होत नव्हता. असाद सरकारला रशिया आणि इराणचे पाठबळ होते. मात्र, आता हे दोन्ही देशही इतर संघर्षात गुंतले असल्याने त्यांची असाद यांना मदत झाली नाही. 

दमास्कसमध्ये घुसविले सैन्य
बंडखोरांनी शनिवार, दि. ७ डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर वेगाने हालचाली करीत आपले सैन्य राजधानी दमास्कसमध्ये घुसविले आणि सरकारी इमारतींचा ताबा घेतला. त्यानंतर असाद सरकार उलथून टाकल्याचे आणि सर्व कैद्यांना मुक्त केल्याचे बंडखोरांच्या प्रतिनिधीने सरकारी वृत्तवाहिनीद्वारे जाहीर केले. त्यानंतर दमास्कससह देशभरातील अनेक शहरांमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरत जल्लोष केला. देशाला रसातळाला नेणारी असाद कुटुंबीयांची सत्ता गेल्याचा आनंद असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.  

यादवीची १४ वर्षे
सीरियाला २०१० पासून अंतर्गत यादवीने पोखरले आहे. या १४ वर्षांत या संघर्षात हजारो लोकांचा मृत्यू झाला. सुमारे सव्वा कोटी, म्हणजे निम्मी लोकसंख्या विस्थापित झाली. सीरियामधील यादवीमध्ये असाद यांच्या बाजूने रशिया, इराण तर बंडखोरांच्या बाजूने तुर्किये आणि अमेरिका यांनी लक्ष घातले. त्यामुळे संघर्ष अधिक पेटला. दरम्यानच्या काळात इसिसने ही ब-याच भूभागावर सत्ता स्थापन करीत दहशतवाद पसरविला होता. असाद यांची सत्ता जाईल, अशी स्थिती १० वर्षांपूर्वीच निर्माण झाली होती. परंतु रशियाने मदत केल्याने हे सरकार टिकले. यावेळी बंडखोरांनी ज्या विद्युतवेगाने राजधानीवर ताबा मिळविला, ते पाहून नागरिक आश्चर्यचकित झाले. 

असाद बेपत्ता
बाशर अल असाद हे १७ जुलै २००० पासून सीरियात सत्तेवर आहेत. त्याआधी त्यांचे वडील हाफिज अल असाद हे १९७१ पासून अध्यक्षपदावर होते. मागील ५० वर्षे असाद कुटुंबीयांनी सीरियावर पोलादी पकड ठेवली होती. मात्र, काही महिन्यांत ही पकड ढिली झाली. बंडखोर दमास्कसमध्ये प्रवेश करण्याच्या तयीरत असल्याचे समजातच असाद हे कुटुंबासह पळून गेले, असे देशाचे पंतप्रधान महमंद गाझी जलील यांनी सांगितले.