शक्तिकांत दास होणार निवृत्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची सोमवार, दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली. विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबरला संपत आहे. मल्होत्रा ११ डिसेंबरपासून गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारतील. सध्या ते केंद्रात महसूल सचिव म्हणून कार्यरत आहेत. आरबीआय गव्हर्नर म्हणून मल्होत्रा यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. २०२२ मध्ये डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने सचिव संजय मल्होत्रा यांना आरबीआयच्या संचालकपदी नेमले होते. त्यामुळे त्यांना आरबीआयच्या कामकाजाचा अनुभव आहे. ते २६ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील.
संजय मल्होत्रा १९९० बॅचचे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये ते आरईसीचे चेअरमन आणि एमडी झाले. त्याआधी त्यांनी ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर काम केले. मल्होत्रा यांनी त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण आयआयटी कानपूरमधून पूर्ण केले. प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी पदव्युतर शिक्षण घेतले. गेल्या ३० वर्षांत त्यांनी ऊर्जा, अर्थ, कर, माहिती-तंत्रज्ञान आणि खाण क्षेत्रात सेवा दिली. सध्या ते केंद्रात महसूल सचिव पदावर कार्यरत आहेत.
मल्होत्रांना बोर्ड ऑफ
डायरेक्टरर्सचा अनुभव
रिझर्व्ह बँकेचे कामकाज सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडून पाहिले जाते. त्याचा अनुभव संजय मल्होत्रा यांच्याकडे आहे. त्यामुळेच त्यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी निवड झाल्याचे बोलले जाते.
अशी होते बोर्डाची निवड
आरबीआय कायद्याच्या अंतर्गत बोर्डाची निवड होते. सरकारकडून संचालकांची निवड केली जाते. ती ४ वर्षांसाठी असते. बोर्डाचे दोन भाग असतात. पहिला ऑफिशियल संचालकांचा असतो. त्यात पूर्णवेळ गव्हर्नर आणि कमाल ४ उपसंचालक असतात तर नॉन ऑफिशियल संचालकांमध्ये २ सरकारी अधिका-यांसह एकूण १० संचालकांची नियुक्ती होते. अन्यांमध्ये ४ संचालक ४ विभागीय बोर्डांमधून सहभागी होतात.
दास यांनी ६ वर्षे सांभाळला पदभार
आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास उद्या निवृत्त होतील. ते सहा वर्षे आरबीआयच्या गव्हर्नरपदी होते. उर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर दास यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. कोरोना कालावधी आणि त्यानंतर महागाईची समस्या निर्माण झालेली असताना दास यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
गर्व्हनरला दिल्या जातात या सुविधा
आरबीआय गव्हर्नरला कोणत्या सुविधा?
आरबीआय गव्हर्नरला मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू परिसरात राहण्यासाठी बंगला दिला जातो. तो बंगला प्रशस्त आणि आलिशान आहे. तो विकला तर त्याची किंमत ४५० कोटींहून अधिक होते. गव्हर्नरला २.५ लाख रुपये वेतन मिळते. आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरला २.२५ लाख तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला २.१६ लाख रुपये इतके वेतन मिळते.