भारतीय क्रीडापटूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

yongistan
By - YNG ONLINE
मनू भाकर, डी गुकेशसह चौघांना खेलरत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
राष्ट्रपती भवनात शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ््यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २०२४ ने सन्मानित केले. मनू-गुकेश यांच्या व्यतिरिक्त भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-अ‍ॅथलीट प्रवीण कुमार यांनाही सन्मानित करण्यात आले.
यासोबतच ३२ भारतीय क्रीडापटूंनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला असून, महाराष्ट्रातील कोल्हापूरचा ऑलिम्पिक नेमबाज स्वप्नील कुसाळेसह ३२ खेळाडूंचा समोवश आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार (आजीवन), राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित आणि लाइटटाइम श्रेणी) आणि मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी विजेत्यांनाही सन्मानित केले. अर्जुन पुरस्कार (आजीवन) प्राप्तकर्त्यांत भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांचा समावेश आहे. त्याने १९७२ च्या पॅरालिम्पिकमध्ये ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरणात पदक जिंकले होते. 
खेलरत्नच्या मानकरींमध्ये २२ वर्षीय मनू भाकरने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिली अ‍ॅथलीट ठरली तर १८ वर्षीय डी गुकेश गेल्या महिन्यात चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून सर्वात तरुण बुद्धिबळ जगज्जेता ठरला. ही कामगिरी करणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय ठरला. दुसरीकडे हरमनप्रीत सिंग टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणा-या हॉकी संघाचा एक भाग होता आणि प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले.  त्यामुळे त्यांना खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेल्या ३२ खेळाडूंपैकी १७ पॅराअ‍ॅथलीट आहेत.
ध्यानचंद खेलरत्नचे मानकरी
१) डी गुकेश (बुद्धिबळ)
२) हरमनप्रीत सिंग (हॉकी)
३) प्रवीण कुमार (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
४) मनू भाकर (शूटिंग)
अर्जुन पुरस्काराचे मानकरी
१) ज्योती याराजी (अ‍ॅथलेटिक्स)
२) अन्नू राणी (अ‍ॅथलेटिक्स)
३) नीतू (बॉक्सिंग)
४) स्वीटी (बॉक्सिंग)
५) वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
६) सलीमा टेटे (हॉकी)
७) अभिषेक (हॉकी)
८) संजय (हॉकी)
९) जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
१०) सुखजित सिंग (हॉकी)
११) राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
१२) प्रीती पाल (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
१३) जीवनजी दीप्ती (पॅराअ‍ॅथलेटिक्स)
१४) अजित सिंग (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
१५) सचिन सर्जेराव खिलारी (पॅराअ‍ॅथलेटिक्स)
१६) धरमबीर (पॅराअ‍ॅथलेटिक्स)
१७) प्रणव सुरमा (पॅराअ‍ॅथलेटिक्स)
१८) एच होकातो सेमा (पॅराअ‍ॅथलेटिक्स)
१९) सिमरन जी (पॅराअ‍ॅथलेटिक्स)
२०) नवदीप (पॅराअ‍ॅथलेटिक्स)
२१) नितेश कुमार (पॅराबॅडमिंटन)
२२) तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
२३) नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
२४) मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
२५) कपिल परमार (पॅरा ज्युदो)
२६) मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
२७) रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
२८) स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
२९) सरबज्योत सिंग (शूटिंग)
३०) अभय सिंग (स्क्वॅश)
३१) साजन प्रकाश (पोहणे)
३२) अमन (कुस्ती)