राज्यात २६ हजार स्टार्ट अप,
देशात स्टार्टअप सुरू झाले, तेव्हा ४७१ स्टार्ट अप होते. आज देशात १ लाख ५७ हजार आहेत. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त मला अभिमानाने सांगावेसे वाटते की महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात २६ हजार स्टार्ट अप आहेत. आपण असे अभियान राबवित आहोत की ज्यामध्ये महिला स्टार्टअपमध्ये सर्व पदांवर असतील. देशात जास्त महिला डायरेक्टर असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, असे फडणवीस म्हणाले.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने गुरुवार, दि. १६ जानेवारी २०२५ रोजी ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
इज ऑफ डूईंग बिझनेसमुळे उद्योग कमी वेळात सुरू करण्यात पारदर्शकता आली आहे. गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य हे देशात पहिले आहे. भविष्यातही मानवी हस्तक्षेप न ठेवता पारदर्शक पद्धतीने उद्योजकांना राज्यात शासना बरोबर उद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे. उद्योग सुरू करताना मुंबई, पुण्यात पोषक वातावरण आहे. नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर ही शहरे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहेत आणि इकोसिस्टम निर्माण करतात असेही ते म्हणाले.