अमेरिकेत जन्मलेल्यांना नागरिकत्व मिळणार

yongistan
By - YNG ONLINE
ट्रम्प यांच्या सिटीझनशिप बर्थराईटच्या धक्कादायक निर्णयाला कोर्टाची स्थगिती
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची २० डिसेंबर रोजी शपथ घेतली आणि धाडसी निर्णय घ्यायला सुरुवात केली. यातील एक निर्णय म्हणजे अमेरिकेत जन्माला आल्यानंतर जन्मसिद्ध नागरिकत्व मिळण्याचा निर्णय रद्द केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आले. या ऐतिहासिक निर्णयामुळे अनेक भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. यावर अमेरिकेतील एका फेडरल न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाला असंवैधानिक असल्याचे नमूद केले आहे. 
जन्माच्या आधारे नागरिकत्व दिले जाणा-या निर्णयासंदर्भातील ट्रम्प यांच्या निर्णयावर न्यायालयाने महत्वाची टिप्पणी करत या कार्यकारी आदेशावर तात्पुरती स्थगिती आणली. न्यायाधीश जॉन कफनॉर यांनी तात्पुरता प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यामुळे अमेरिकेत जन्मलेल्या सर्व नवजात बालकांना तूर्तास तरी अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे.
जन्माच्या आधारे नागरिकत्व दिला जाणारा निर्णय रद्द केल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय असंवैधानिक असल्याची टिप्पणी केली आणि ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली. 
ट्रम्प यांनी ‘सिटिझनशिप बर्थराइट’ नागरिकत्वाविषयी धाडसी निर्णय घेतला होता. यामुळे अमेरिकेत राहत असूनही त्या देशाचे नागरिक नसलेल्यांना अमेरिकी भूमीवर अपत्यप्राप्ती झाल्यास केवळ त्या जन्माच्या निकषावर बाळाला आपोआप अमेरिकी नागरिकत्व मिळणार नाही, असे म्हटले होते. याचा फटका केवळ तेथील बेकायदा स्थलांतरितांनाच नव्हे, तर एच-वन बी व्हिसासारख्या तात्पुरत्या तरतुदीवर तेथे राहत असलेल्या असंख्य भारतीयांनाही बसणार होता.