ट्रम्प यांचे ४२ निर्णय, २० हजार भारतीय संकटात

yongistan
By - YNG ONLINE
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी दुस-यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. दुस-या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी तब्बल ४२ निर्णयांवर स्वाक्षरी केली. यामध्ये कॅनडा व मेक्सिकोवर अतिरिक्त आयात शुल्क आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच अमेरिकेत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणा-या इतर देशातील नागरिकांना देशाबाहेर काढण्यासंदर्भात कठोर पावले उचलण्याचा निर्णयही घेतला. यामुळे इतर देशातील नागरिकांप्रमाणेच अमेरिकेत वास्तव्य करणा-या भारतीयांपैकी २० हजार भारतीयांवर हद्दपारीची टांगती तलवार आहे. त्यामुळे अमेरिकेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी पार्ट टाइम नोक-या सोडण्यास सुरू केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेतील अनेक भारतीय विद्यार्थी पार्ट टाइम नोक-या करायचे. पण हद्दपारीच्या भीतीने त्यांनी आपले काम सोडण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत टिकून राहण्यासाठी अशा नोक-या अत्यंत महत्त्वाच्या असल्या तरी अमेरिकन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जामुळे भवितव्य धोक्यात घालवू इच्छित नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या नियमांनुसार एफ-१ व्हिसावर अमेरिकेत आलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये आठवड्यातून २० तास काम करण्याची परवानगी आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी भाडे, किराणा सामान आणि इतर राहणीमान खर्च भागवण्यासाठी कॅम्पसबाहेर आणि रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप किंवा किरकोळ दुकानांमध्ये काम करतात. आता नवीन प्रशासनाने इमिग्रेशन धोरणांभोवतीचे बंधन कडक करण्याचे आणि कठोर नियम लागू करण्याचे संकेत दिले. त्यामुळे ते पार्ट टाइम नोक-या सोडून देत आहेत.

३ लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेत
अमेरिकेत आज जवळपास ३ लाख भारतीय विद्यार्थी वास्तव्य करत आहेत. तसेच अमेरिकेत कामासाठी दिला जाणारा एच-१ बी व्हिसा मिळवणा-यांमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. इतर कोणत्याही देशातील नागरिकांपेक्षा अमेरिकेत राहणा-या भारतीयांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, त्यापैकी तब्बल २० हजार भारतीयांना हद्दपारीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अपु-या कागदपत्रांमुळे या भारतीयांवर स्थानिक पद्धतीनुसार कायदेशीर कारवाई चालू आहे. त्यामुळे २० हजार भारतीयांना तातडीने अमेरिकेतून परत पाठवले जाण्याचा धोका आहे.

२० हजार भारतीयांचे 
कागदपत्रांशिवाय वास्तव्य
कोणत्याही कागदपत्रांशिवाय किंवा पुरेशा कागदपत्रांशिवाय अमेरिकेत वास्तव्य करणा-या भारतीयांची संख्या जवळपास २० हजार ४०७ आहे. त्याशिवाय यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट विभागाच्या ताब्यात असणा-या भारतीयांचाही यात समावेश आहे. यापैकी १७ हजार ९४० भारतीयांकडे आवश्यक ती कागदपत्रे नाहीत. इतर २ हजार ४६७ भारतीय आयसीईच्या ताब्यात आहेत.