इम्रान खान यांना १४ वर्षांचा तुरुंगवास

yongistan
By - YNG ONLINE
भ्रष्टाचार प्रकरणी पत्नीलाही ७ वर्षांची शिक्षा
इस्लामाबाद : वृत्तसंस्था 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांना १९० दशलक्ष पौंडच्या अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. यानंतर शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२४ रोजी इम्रान खान यांना १४ वर्षे तर त्यांच्या पत्नीला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश नसीर जावेद राणा यांनी या प्रकरणी निकाल दिला. यापूर्वी तीन वेगवेगळ््या कारणांमुळे या निकालाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 
इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून रावळपिंडी येथील तुरूंगात आहेत. दरम्यान आर्थिक गैरव्यवहाराच्या बाबतीत या खटल्यातील आलेला निकाल हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निकाल आहे. इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या २०१८ ते २०२२ या कार्यकाळात एक जमीन डेव्हलपरने बेकायदा लाभाच्या बदल्यात काही जमीन भेट दिल्याचा आरोप होता. इम्रान खान आणि पत्नी बुशरा बीबी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले. दरम्यान, इम्रान खान यांचा पक्ष आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या शिक्षेची सुनावणी तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. बुशरा बीबी जामिनावर तुरुंगाबाहेर होत्या, त्यांनादेखील या प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर ताब्यात घेण्यात आले.