भारतीय महिला, पुरुष संघ खो खोत जगज्जेता

yongistan
By - YNG ONLINE
खो-खो विश्वचषकात भारतीय संघांनी फडकवला झेंडा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
पहिलाच खो-खो विश्वचषक भारतात खेळवला गेला आणि भारताच्या महिला-पुरूष या दोन्ही संघांनी इतिहास घडवत रविवार, दि. १९ जानेवारी २०२५ रोजी जग्गजेतेपद पटकावले. प्रथम महिला खो-खो संघ आणि त्यानंतर पुरूष खो-खो संघाने नेपाळला नमवत विश्वचषक जिंकला. भारतीय पुरुष संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित होता. अंतिम फेरीतही पुरुष संघाने शानदार विजय मिळवित जग्गजेतेपद पटकावले.
महिला खो-खो संघाने नेपाळचा ७८-४० च्या फरकाने पराभव केला तर पुरूष संघाने नेपाळचा ५४-३६ च्या फरकाने सामना जिंकला. नेपाळच्या पुरूष संघाने भारताला चांगलीच टक्कर दिली. पण अखेरीस भारताने बाजी मारली.
खो-खो विश्वचषक २०२५ पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाची नेपाळविरुद्ध चांगली सुरुवात झाली, ज्यामध्ये त्यांनी पहिल्या टर्नमध्ये २६ गुण मिळवले आणि नेपाळ संघाला खाते उघडण्याची संधीही दिली नाही. दुस-या टर्नमध्ये नेपाळ संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. ज्यात त्यांनी एकूण १८ गुण मिळवले. परंतु टीम इंडियाने ८ गुणांची आघाडी कायम राखली.
तिस-या टर्नमध्ये भारतीय पुरुष खो-खो संघाने शानदार पुनरागमन केले, ज्यामध्ये त्यांनी नेपाळला विजेतेपदाच्या सामन्यातून पूर्णपणे बाहेर केले आणि त्यांचे गुण ५० च्या पुढे नेले. भारतीय पुरुष खो-खो संघाने नेपाळविरुद्धच्या अंतिम सामन्यात पहिल्या तीन टर्नमध्ये आपली आघाडी कायम ठेवली होती. चौथ्या टर्नमध्येही चांगली कामगिरी करत ५४-३६ अशा फरकाने सामना जिंकला.
पुरुष संघाने दुस-यांदा 
केला नेपाळचा पराभव
भारतीय पुरुष खो-खो संघाने या विश्वचषकात दुस-यांदा नेपाळ संघाचा पराभव केला आहे, याआधी गट सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने आले होते आणि त्यातही टीम इंडिया विजय मिळवण्यात यशस्वी ठरली होती. पुरुषांच्या खो-खो विश्वचषकाच्या पहिल्याच सीझनमध्ये एकूण २० संघांनी भाग घेतला होता.