अर्थव्यवस्थेतील सिंह हरपला

yongistan
By - YNG ONLINE
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग कालवश, देशावर शोककळा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
देशाचे पंतप्रधान म्हणून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतानाच एक अर्थतज्ज्ञ म्हणून देशाची घडी बसविणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाने भारतीय अर्थव्यवस्थेतील सिंह हरपला. डॉ. मनमोहनसिंग यांचे गुरुवार, दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. २००४ ते २०१४ या काळात देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. देशात अर्थक्षेत्रात क्रांती घडवून आणणा-या डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे. देशात ७ दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार असून, उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शुक्रवारचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. 
डॉ. मनमोहनसिंग यांना गुरुवारी रात्री ८ वाजता आपत्कालीन परिस्थितीत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसात इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे श्वसनाचा त्रास होत होता. प्रकृती खालावल्याने एम्समधील डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करीत होते. प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी तात्काळ रुग्णालयात हजेरी लावून प्रकृतीची विचारपूस केली. पण काही वेळातच उपचारादरम्यान रात्री ९.५१ वाजता डॉ. मनमोहनसिंग यांची प्राणज्योत मालवली. 
मनमोहनसिंग यांनी २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून धुरा सांभाळली. तत्पूर्वी, १९९१ ते १९९६ या काळात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून महत्त्वाचे निर्णय घेत देशाची आर्थिक घडी बसविण्याचे महत्त्वाचे काम केले. देश आर्थिक संकटात असताना त्यांनी घेतलेल्या उदारीकरण, जागतिकीकरणाच्या निर्णयामुळे मोठी आर्थिक वृद्धी झाली. यामुळे भारतात परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आली. त्यांनी अर्थमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून  देश विकासाच्या दृष्टीने खूप चांगल्या गोष्टी दिल्या. त्यामुळे भारतीय राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
मनमोहनसिंग यांनी अलिकडेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. ३३ वर्षे ते खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. १९९१ साली राज्यसभेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.परंतु ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते १० वर्षे देशाचा राज्य कारभार सांभाळणारे पंतप्रधान ठरले. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.
मनमोहनसिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे १४ वे पंतप्रधान होते. मनमोहनसिंग हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित होते. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ इथून शिक्षण घेतले. त्यांनी १९५७ ते १९६५ या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. ते १९६९-७१ या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर १९७६ मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 
आर्थिक क्षेत्रात मोठे योगदान
१९८२ ते १९८५ या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तर १९८५-८७ या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. १९९० ते १९९१ या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. त्यानंतर १९९१ मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री राहिले. त्यानंतर सलग दोन टर्म म्हणजे २००४ ते २०१४ पर्यंत ते देशाचे पंतप्रधान राहिले. त्यामुळे देश विकासासाठी त्यांचे अनेक निर्णय महत्त्वाचे ठरले आहेत. 
महत्त्वपूर्ण निर्णयामुळे 
देश विकासाला गती
डॉ. मनमोहनसिंग २००४ मध्ये पंतप्रधान झाले, त्यावेळी अ‍ॅक्सिडेंटल प्राईममिनिस्टर म्हटले गेले. परंतु त्यांच्या काळातील महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देश विकासाला गती मिळाली. त्यांनी ६ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांन मोफत शिक्षण, लोकशाही मजबुतीच्या दृष्टीने माहितीचा अधिकार दिला. भूकबळी ठरू नये, यासाठी अन्नसुरक्षा कायदा, भूसंपादन कायदा, वनअधिकारी कायदा, १०० दिवसांचा रोजगार देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), इंदिरा गांधी मातृत्व योजना यासारखे ऐतिहासिक निर्णय घेतले.