भारतासह जगभरातील निम्म्या लोकसंख्येने या वर्षांत मतदान केले. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीकोनातून हे वर्ष महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर मध्यपूर्वेतील संघर्ष, युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध याचीही बरीच चर्चा झाली. जर्मनी, फ्रान्स, अमेरिकेत निवडणुकीच्या माध्यमातून सत्तांतर झाले तर बांगलादेशात शेख हसीना यांना जनआंदोलनामुळे सत्तेतून पायउतार व्हावे लागले. सीरियातही बशर अल-असद यांना त्यांच्या कुटुंबाची पाच दशकांची सत्तासोडून पळ काढावा लागला. त्यामुळे २०२४ मध्ये जागतिक स्तरावर प्रचंड उलथापालथ पाहायला मिळाली.
इराण-इस्रायल संघर्ष
२०२३ मध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात संघर्ष उडाला होता. या युद्धाला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोवरच इराण आणि इस्रायल यांच्यातही संघर्ष पेटला. इराणमधील हेजबोला संघटनेने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागली. त्यानंतर इस्रायलनेही त्यांना सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष पेटला.
बांगलादेशमध्ये सत्तांतर
भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेशात ऑगस्ट २०२४ मध्ये मोठी उलथापालथ झाली. निवडणुकीद्वारे पुन्हा सत्तेत आलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांना स्वत:च्या देशातूनच पळ काढावा लागला. त्या पुन्हा निवडून आल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आरक्षणाच्या विरोधात आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची व्याप्ती देशभर पसरली, ज्यातून नंतर हिंसाचार भडकला. हिंसाचाराचे लोण पंतप्रधान निवासस्थानापर्यंत पोहोचल्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेशमधून काढता पाय घेतला आणि त्या भारताच्या आश्रयाला आल्या. त्यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर अल्पसंख्याक हिंदू समाजावर अत्याचार सुरू झाले. याविरोधात आवाज उठविला गेला.
भारत-कॅनडामध्ये संघर्ष
कॅनडामध्ये मागच्या वर्षी खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरची हत्या झाली. या हत्येनंतर कॅनडा आणि भारत यांच्यामधील द्विपक्षीय संबंधात तणाव निर्माण झाला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी या हत्येबद्दल भारतावर गंभीर आरोप केले. यानंतर भारताने कॅनडाचे उच्चायुक्त आणि राजनैतिक अधिका-यांना तर देशाबाहेर जायला सांगितले, त्याशिवाय भारताचे कॅनडामधील उच्चायुक्त आणि राजनैतिक अधिका-यांना माघारी बोलाविण्यात आले. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले.
सीरियामध्ये सत्तांतर
२०२४ च्या शेवटच्या महिन्यात सीरियाच्या बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला आणि अध्यक्ष बशर अल असाद यांची राजवट उलथवून टाकली. बंडखोर दमास्कसमध्ये शिरत असताना लष्कराने आधीच माघार घेतली होती. त्यामुळे असाद यांनी दमास्कसमधून पळ काढला. सशस्त्र बंडानंतर राष्ट्राध्यक्ष बशर असद यांना देश सोडून पळावे लागले. यामुळे असद घराण्याची ५० वर्षांची एकाधिकारशाही एका रात्रीत संपुष्टात आली. दमास्कस ताब्यात घेतल्यानंतर बंडखोर इराणच्या दूतावासामध्ये घुसले आणि तिथे मोडतोड केली. या बंडामुळे असद यांना पाठिंबा देणा-या रशिया आणि इराणला हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. त्याच वेळी इस्रायलला मात्र आपली सीमा सुरक्षित करण्याची संधी मिळाली आहे.
दक्षिण कोरियात आणीबाणी
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी ३ डिसेंबर रोजी आणीबाणी जाहीर केली, पार्लमेंटने ती काही तासांत मागे घेतली. त्यानंतर आता यून येओल यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची तयारी सुरू झाली आहे. उत्तर कोरियाच्या समर्थक कम्युनिस्ट शक्ती देशात कार्यरत असून त्या पार्लमेंटवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण आणीबाणी लागू करून या शक्तींचे उच्चाटन करण्याचा आणि संवैधानिक लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण करत असल्याचा दावा यून येओल यांनी ‘मार्शल लॉ’ची घोषणा करताना केला. यातच दक्षिण कोरियाचे पुढील अंदाजपत्रक कसे असावे यावरून त्यांचा विरोधी पक्षांबरोबर संघर्ष सुरू आहे.