लालपरीचा प्रवास महागला

yongistan
By - YNG ONLINE
- तिकिटात १४.९५ टक्के वाढ, सर्वसामान्यांना महागाईच्या झळा
मुंबई : एसटी महामंडळाने एसटी बसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव आधीच राज्य सरकारकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, त्यानुसार तिकीट दरात १४.९५ टक्के वाढ झाली आहे. ही दरवाढ मध्यरात्रीपासूनच लागू झाली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही १ फेब्रुवारीपासून महागणार आहे. 
राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्याआधी एसटी महामंडळाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक पार पडली. या बैठकीत एसटी बसच्या तिकिट दरवाढीला मंजुरी देण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार  एसटीच्या तिकिटात १४.९५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. 
एसटी महामंडळाने ३ वर्षांत तिकीट दरात वाढ केली नव्हती. त्यामुळे तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. डिझेल दरवाढ आणि कर्मचा-यांना देण्यात आलेली पगारवाढ यामुळे तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला रोज ३ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले. डिझेलचे दर वाढत आहेत, मेंटनन्सचा खर्च अधिक येतो. त्यामुळे एसटी बस तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आल्याचे सरनाईक म्हणाले.