मानधना आयसीसीची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेट खेळाडू

yongistan
By - YNG ONLINE
मुंबई : प्रतिनिधी
स्मृती मानधनाने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला आहे. गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी आयसीसीने मानधानाला हा सन्मान दिला. मानधानाने चौथ्यांदा आयसीसी पुरस्कार जिंकला. २०१८ मध्ये तिने पहिल्यांदा हा पराक्रम केला होता. यानंतर २०२१ मध्ये तिने आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकला आणि यावेळी तिची वर्षातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटर म्हणून निवड झाली. भारतीय महिला संघाची उपकर्णधार मानधानाने गेल्या वर्षी चमकदार कामगिरी करत १३ सामन्यांत ७४७ धावा केल्या होत्या. एका कॅलेंडर वर्षात तिने केलेल्या या सर्वाधिक धावा होत्या. या काळात मानधनाने ५७.८६ च्या सरासरीने आणि ९५.१५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. मानधानाने या कालावधीत चार एकदिवसीय शतके झळकावली होती, जो महिलांमध्ये एक विक्रम आहे. मानधानाने २०२४ मध्ये ९५ चौकार आणि सहा षटकार मारले आणि ती आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.