चॅटजीपीटीला चीनने दिला डीपसीकचा पर्याय

yongistan
By - YNG ONLINE


चिनी एआय मॉडेलने दिला अमेरिकन तंत्रज्ञानाला धक्का

बीजिंग : वृत्तसंस्था 

आजचे जग तंत्रज्ञानाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशीयल इंन्टेलिजन्सच्या येण्याने तर तंत्रज्ञानात अद्भूत आणि विस्मयकारक बदल झाले आहेत. एआयच्या मदतीने एका तासात होणारे काम अवघ्या ५ मिनिटांत होत आहे. चॅट जीपीटी, मेटा एआय हे एआय जगातील अग्रणी मानले जातात. मात्र या सर्वांचीच झोप उडवणारी एआय यंत्रणा चीनने आणली आहे. चीनने या यंत्रणेला डीपसीक असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान येताच आता चॅट जीपीटीसारख्या एआय यंत्रणांची झोप उडाली आहे. 

चीनी एआय मॉडेल डीपसीक एआयने तंत्रज्ञानस्नेही तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करणा-यांचे लक्ष स्वत:कडे ओढून घेतले आहे. अ‍ॅप स्टोअरवर तर या डीपसीकने  ओपन एआय या कंपनीच्या चॅट जीपीटीलाही मागे टाकले. डीपसीकने दिलेल्या सुविधांकडे संपूर्ण जग आकर्षित झाले असून चॅट जीपीटी, मेटा एआय या सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणा-या प्लॅटफॉर्मसची झोप उडाली. विशेष म्हणजे चीनी कंपनीने विकसित केलेला हा डीपसीक एआय मंच तुम्हाला तुमच्या मोबाईल तसेच लॅपटॉपवरही वापरता येणार आहे. 

मूळच्या चीनच्या कंपनीने तयार केलेले डीपसीक एआय हे एक ओपन सोअर्स एआय मॉडेल आहे. या एआय तंत्रज्ञानाचा परवाना सध्या मॅसाच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेकडे आहे. येणा-या कुठल्याही अडचणींवर उत्तर शोधण्यासाठी हा एक खुला आणि मोफत असा मंच आहे. यावर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक तसेच कार्यालयीन समस्यांवर उत्तर शोधता येऊ शकते. तुम्ही प्ले स्टोअरवरून तसेच आयओएस स्टोअरवरून हे अ‍ॅप इन्स्टॉल करू शकता.  

डीपसीक या एआय चॅटबॉटवर २०२३ साली काम करण्यास सुरुवात झाली. या कंपनीचे सीईओ लियांग वेनफेंग हे आहेत. ते याआधी हाय-फ्लायर नावाच्या हेज फंडचे संस्थापक होते. याच फंडाने डीपसीकला आर्थिक पाठबळ पुरवले आहे. या कंपनीने २०२२ साली एनविदिया या कंपनीकडून उच्च कार्यक्षमता असणा-या साधारण १० हजार ए १०० ग्राफिक प्रोसेसर चिप खरेदी केल्या होत्या. याच चिपच्या मदतीने डीपसीकने आपले पहिले एआय तंत्रज्ञान बाजारात आणले आहे. सध्या अमेरिकेने या चिप चीनला देण्यास बंदी घातली. अमेरिकेने चिप पुरण्यास बंदी घातल्यानंतर डीपीसकने सध्या लॉन्च करण्यात आलेले एआय मॉडेल हे एनविदिया कंपनीच्या कमी कार्यक्षमता असलेल्या एच ८०० चिपच्या मदतीने विकसित करण्यात आलेले असल्याचा दावा डीपसीक कंपनीने केला.

चॅट जीपीटीचा चिनी पर्याय

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारेडीपसीक तंत्रज्ञान म्हणजे सोप्या शब्दांत चॅटजीपीटीचा चीनी पर्याय आहे. मात्र, यात सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे चॅटजीपीटीपेक्षा अतिशय कमी खर्चात हे तंत्रज्ञान उभे करण्यात आले. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर डीपसीक मोबाईल अ‍ॅप मोफत डाऊनलोड करता येत असून चॅटजीपीटीप्रमाणेच विचारलेल्या बाबींवर हे तंत्रज्ञान आपल्याला माहिती पुरवते.