ओटावा : वृत्तसंस्था
भारतविरोधी भूमिकेसाठी चर्चेत आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सलग ९ वर्षांच्या कारकिर्दीनंतर सोमवार, दि. ६ जानेवारी २०२५ रोजी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. पक्षातील अंतर्गत मतभेद आणि त्यांची लोकप्रियता कमी झाल्याने ट्रूडो यांना राजीनामा द्यावा लागला. ट्रूडो म्हणाले की, लिबरल पक्षाने उत्तराधिकारी निवडल्यानंतर त्यांनी पद सोडण्याचे योजिले आहे. यासोबतच त्यांनी गव्हर्नर जनरल मेरी सायमन यांना २४ मार्चपर्यंत संसद तहकूब करण्यास सांगितले आणि त्यांनी ही विनंती स्वीकारली असल्याचे ट्रुडो म्हणाले.
२०१५ साली ट्रूडो कॅनडाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यांनी सलग ९ वर्षे देशाचे नेतृत्व केले. यासोबतच लिबरल पक्षात आता नव्या नेत्याचा शोध सुरू झाला आहे. ट्रुडो यांच्या राजीनाम्यामुळे आता कॅनडातील निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. खरे तर ते चौथ्यांदा निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. कारण लवकरच निवडणूक लागणार होती. परंतु आता त्यांना पंतप्रधानपदासोबत पक्षाचे अध्यक्षपदही सोडण्याची वेळ आली. कदाचित भारताचा विरोध त्यांना भोवला असावा. कारण तेव्हापासूनच त्यांची प्रतिमा ढासळली.
ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर, लिबरल पक्ष पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेण्यासाठी अंतरिम नेत्याच्या नावावर विचारविनिमय करणार आहे. लिबरल पक्षातील अनेक नेते सध्या पंतप्रधानपदासाठी दावा करत आहेत. खलिस्तानवादी हरदीप सिंग निज्जर यांंच्या हत्येवरुन ट्रूडो यांनी भारतविरोधी भूमिका घेतली होती. भारतावर त्यांनी गंभीर आरोप केले होते. यामुळे कॅनडाचे भारताशी असलेले संबंध दुरावले होते. यानंतर त्यांची लोकप्रियता एकाएकी घसरली.
ट्रुडोंचे वडील पियरे ट्रुडो १९६८ मध्ये सत्तेवर आले होते. ते १६ वर्षे पंतप्रधान होते. त्यांची तुलना जॉन एफ. केनेडी यांच्याशी केली जात होती. त्यांच्यानंतर सर्वांत कमी वयाचे पंतप्रधान होण्याचा मान जस्टिन ट्रुडो यांच्या नावे नोंदला गेला. ट्रुडो यांची पत्नी एक पूर्व मॉडेल आणि टीव्ही होस्ट आहे. ट्रुडो हे माजी शिक्षक, नाईट क्लब बाऊन्सर आणि स्नोबोर्ड प्रशिक्षक राहिले आहेत.