नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसीचा वर्षातील (२०२४) सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारा बुमराह भारताचा पहिला गोलंदाज ठरला. ज्याने वर्षभरात क्रिकेटच्या तीनही प्रकारात शानदार प्रदर्शन केले, त्या क्रिकेटपटूला आयसीसी क्रिकेटर ऑफ ईयर म्हणजेच सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार दिला जातो. बुमराह यंदाचा मानकरी ठरला. या आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, रविचंद्रन अश्विन, विराट कोहली या भारतीय क्रिकेटपटूंना हा मान मिळाला. आपल्या एका षटकाच्या जोरावर संपूर्ण सामन्याचा रोख बदलणारा जसप्रीत बुमराह भारताचा गेमचेंजर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.
सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कारासाठी जसप्रीत बुमराह बरोबर आस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड, इंग्लंडचा जो रूट आणि हॅरी ब्रुक यांना नामांकन दिले गेले होते. या तीनही खेळाडूंनी गेल्या वर्षभरात शानदार प्रदर्शन केले. यात जसप्रीत बुमराहची सर्वश्रेष्ठ क्रिकेटर पुरस्कार सर गारफील्ड सोबर्ससाठी निवड केली. २०२४ मध्ये बुमराहने कसोटी, मर्यादित षटकांच्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली. आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमावरीत बुमराहची प्रभावी गोलंदाजी ठरली, ज्यामध्ये त्याने ९०० गुणांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा कोणत्याही भारतीय गोलंदाजाकरिता सर्वोच्च होता.
कसोटी क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून बुमराहची निवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये १३ सामन्यांत बुमराहने ७१ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच बॉर्डर-गावस्कर चषकातही भारताकडून बुमराहने सर्वोत्तम कामगिरी केली होती. तसेच शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या टी-२० विश्वचषक विजयात मोठा वाटा उचलला होता.