अहिल्यानगर : प्रतिनिधी
पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळला यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब मिळाला. रविवार, दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी सोलापूरचा कुस्तीपटू महेंद्र गायकवाड याला पराभूत करीत मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. मॅटवर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर मोहोळने महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. २ गुण मिळवित त्याने गायकवाडचा पराभव केला.
अहिल्यानगर येथे आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांच्यात ६७ व्या महाराष्ट्र केसरी किताबसाठी लढत रंगली. यात मोहोळने बाजी मारली. पृथ्वीराज मोहोळला चांदीची गदा आणि थार गाडी देऊन सन्मानित करण्यात आले.
अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी एकूण ८६० मल्लांनी नोंदणी केली होती. उपांत्य फेरीत गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षेविरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला तर माती विभागात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात महेंद्र गायकवाडने मैदान मारले. त्यामुळे महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम फेरी गाठलेल्या महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगला. अटीतटीची लढत सुरू असताना अंतिम सामन्यातही पंचाच्या निर्णयावर महेंद्र गायकवाड याने नाराजी व्यक्त केली आणि मैदान सोडले. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केले.
पंचाला लाथ मारल्याने अभूतपूर्व गोंधळ
उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला. यात शिवराज राक्षेचा पराभव झाला. पैलवान शिवराज राक्षेने पंचांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत थेट पंचाला लाथ मारली. त्यामुळे सामन्यात मोठा गोंधळ उडाला.
गायकवाड, राक्षेवर
तीन वर्षांची बंदी
उपांत्य सामन्यात शिवराज राक्षे याने पंचाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवत थेट पंचासोबत हुज्जत घातली तर अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड याने पंचाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवत अखेरच्या क्षणी मैदान सोडले. हे कृत्य दोन्ही पैलवानांना महागात पडले. कारण राज्य कुस्तीगीर परिषदेने या दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित केले. त्यामुळे राक्षे आणि गायकवाडला ३ वर्षे महाराष्ट्र केसरीमध्ये खेळता येणार नाही.