मुंबई : प्रतिनिधी
भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी १ फेब्रुवारी २०२५ रोजी संसदेत मोदी सरकारच्या तिस-या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर अवघ्या तीन दिवसांत देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे या महापालिकेचे बजेट हे ८ राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे. मग ही आठ राज्ये कोणती, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल.
देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. ज्याचे पूर्ण नाव बृहन्मुंबई महानगरपालिका असे असून आज मुंबई महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा आहे. मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्यावर्षी मुंबई महापालिकेचे बजेट ६५ हजार १८० कोटी इतके होते. म्हणजेच यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत १४.१९ टक्क्यांनी वाढ करण्यात आली.
ही आहेत ८ राज्ये
देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. यानंतर आता विविध राज्यांचे बजेट येण्यास सुरुवात होईल. २०२५ या आर्थिक वर्षासाठी मुंबई महापालिकेचे (बीएमसी) बजेट ७४,४२७ कोटी रुपये होते जर आपण राज्यांबद्दल बोललो तर २०२५ च्या आर्थिक वर्षात हिमाचल प्रदेशचे बजेट ५८,४४३.६१ कोटी रुपये होते तर मेघालयाचे ५२,९७४ कोटी, अरुणाचल प्रदेशात ३४,२७० कोटी रुपये, त्रिपुरात २२,९८३ कोटी रुपये, मणिपूरमध्ये २९,२४६ कोटी रुपये, मिझोरममध्ये १३,७८६ कोटी रुपये, नागालँडमध्ये १९,४८५ कोटी रुपये आणि सिक्कीममध्ये १३,५८९ कोटी रुपयांचे बजेट मांडले जाते. म्हणजेच या ८ राज्यांच्या तुलनेत मुंबई महापालिकेचे बजेट अधिक आहे.