ज्ञानेश कुमार देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त

yongistan
By - YNG ONLINE

उद्या राजीवकुमार यांची जागा घेणार, अधिसूचना जारी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची देशाचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ेसोमवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे शिफारस केली. त्यानंतर तातडीने ज्ञानेश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत अधिसूचना जारी करण्यात आली. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार हे मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे १९ फेब्रुवारी रोजी ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील. 
मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा २०२३ च्या कलम ४ च्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. ज्ञानेश कुमार हे केरळ केडरचे १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या वर्षी मार्चपासून ते निवडणूक आयुक्तपदाची धुरा सांभाळत आहेत. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची सोमवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी राजधानी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची शिफारस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी समितीचा भाग म्हणून उपस्थित होते. 
राहुल गांधींची असहमती
ज्ञानेश कुमार यांच्या निवडणुकीत्चा अधिसूचनेदरम्यान राहुल गांधी यांनी असहमती पत्र पाठविले. सर्वोच्च न्यायालयात या मुद्यावर सुनावणी असल्याने त्यांनी बैठक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. तसेच कॉंग्रेस नेते तथा ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनीदेखील ही बैठक पुढे ढकलण्याची मागणी केली. परंतु राहुल गांधींची विनंती सत्ताधा-यांनी अमान्य केली.